जपून वापरा पाणी अन्यथा संकट!
By Admin | Updated: November 29, 2014 00:00 IST2014-11-28T23:59:02+5:302014-11-29T00:00:53+5:30
अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजच पाणी टंचाई आ वासून उभी राहिली आहे. जिल्ह्यातील शहरी भाग मात्र तुलनेने पाणी टंचाईच्या तीव्र झळांपासून अद्याप दूर आहे.

जपून वापरा पाणी अन्यथा संकट!
अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजच पाणी टंचाई आ वासून उभी राहिली आहे. जिल्ह्यातील शहरी भाग मात्र तुलनेने पाणी टंचाईच्या तीव्र झळांपासून अद्याप दूर आहे. कोपरगाव, शिर्डी, कर्जत, अकोले या शहरांसाठी तातडीने उपाययोजना आवश्यक आहेत. अहमदनगर, श्रीरामपूर, संगमनेर, श्रीगोंदा या शहरातील नागरिकांना आज पाण्याच्या संकटाला तोंड द्यावे लागत नाही. मात्र पाणी जपून वापरले नाही, तर ही स्थिती कायम राहील, याची शाश्वती नाही. नगर शहरातील उपनगरे मात्र आजच पाण्यासाठी कासावीस आहेत. पावसाचे प्रमाण कमी असल्याने जिल्हा पुन्हा एकदा दुष्काळाच्या तोंडावर आहे. शहरी नागरिकांनी ‘पाणी वापरावे जपून’ हा मंत्र अंगीकारणेच अधिक योग्य ठरेल.
‘मुळा’त मुबलक साठा... : ‘मे’पर्यंत निवांत
अहमदनगर : मुळा धरणात यंदा मुबलक पाणी साठा असल्याने नगर शहरातील पाणी पुरवठ्याची चिंता महापालिकेला नाही. धरणातील पाणी पातळी १७५२ फुटांच्या खाली गेल्यानंतरच शहर पाणी उपसा योजनेला घरघर लागण्यास सुरूवात होते. मात्र ही पातळी अजून ३ हजार फूट उंचीवर आहे. मे २०१५ पर्यंत तरी शहराच्या पाण्याची चिंता नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
‘मुळा’ धरणातील पाण्यावर शहराची तहान भागविली जाते. १९७३,१९८६,१९९७ आणि आता २००८ मध्ये १२४ कोटी रुपयांची पाणी योजना राबविण्यात आली. शहरासाठी राबविण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेतून लगतच्या ९ ग्रामपंचायतींना पाणी दिले जाते. शहरापासून मुळा धरण ३५ किमी अंतरावर असून तेथून शहराला पाणी पुरवठा होतो. शहराची लोकसंख्या चार लाखाच्या आसपास पोहचली आहे.शहरातील या लोकसंख्येची तहान भागविण्यासाठी ६२ दशलक्ष लीटर पाणी रोज लागते. धरणातून पाणी नगरपर्यत पोहचताना गळती होऊन प्रत्यक्षात ५२ दशलक्ष लीटर पाणी वितरण होते. मुळा धरणातील पाणी पातळी खालावली की शहराच्या पाणी पुरवठ्यावर त्याचा परिणाम होतो. यंदा मुळा धरणात मुबलक पाणी साठा आहे. धरणातील पाण्याची पातळी २ हजार फुटापेक्षाही अधिक आहे. १७५२ फुटाच्या खाली पाणी पातळी जाण्यास मे तरी उजाडेल असा महापालिका प्रशासनाचा अंदाज आहे.