मल्टीस्टेटच्या पिंजर्यात अर्बन बँक
By Admin | Updated: December 4, 2014 15:23 IST2014-12-04T15:23:38+5:302014-12-04T15:23:38+5:30
एका शतकाची परंपरा असलेली बँक सामान्य सभासदांच्या हातातून केव्हाच निसटली आणि ती मल्टीस्टेटच्या सोनेरी पिंजर्यात अडकली.

मल्टीस्टेटच्या पिंजर्यात अर्बन बँक
सुदाम देशमुख■ अहमदनगर
'एकमेका साह्य करू,अवघे धरू सुपंथ' या सहकाराच्या तत्त्वाला केंद्रीभूत मानून नगर अर्बन बँकेची स्थापना झाली. एका शतकाची परंपरा असलेली बँक सामान्य सभासदांच्या हातातून केव्हाच निसटली आणि ती मल्टीस्टेटच्या सोनेरी पिंजर्यात अडकली. सहकाराच्या कायद्यातून हळुवारपणे बँक निसटली. सामान्यांची बँक सहकाराकडून स्वाहाकाराकडे तर जात नाही ना? अशी भीती निर्माण झाली. हीच भीती नगर अर्बन बँकेच्या प्रचाराचा कळीचा मुद्दा ठरली आहे. निवडणुकीच्या निमित्ताने बँकेच्या गौरवशाली इतिहासाला एक उजाळा!
नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. ही जिल्ह्यातील एक अग्रगण्य अर्थसंस्था आहे. कोणत्याही संस्थेच्या इतिहासात १0४ वर्षांची कार्यक्षम सहकारी सेवा ही अत्यंत महत्त्वाची घटना ठरावी. बॅकिंगच्या कार्यकक्षा समाजातील उपेक्षित व अत्यंत गरजू घटकांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश घेऊनच बँकेचा जन्म झाला. चैत्र शुद्ध प्रतिपदा शके १८३२ म्हणजेच १0 एप्रिल १९१0 रोजी या बँकेचे कामकाज प्रत्यक्षात सुरू झाले. कै. रावबहाद्दूर चितळे यांनी बँकेची स्थापना केली. कै. भाऊसाहेब फिरोदिया यांनी बँकेच्या उत्कर्षासाठी अविरत परिश्रम घेतले.
संस्मरणीय टप्पे..
■ जिल्हा कार्यक्षेत्र असणारी आणि संलग्न बिगर शेतकी संस्थांना पतपुरवठा करणारी राज्यातीलच नव्हे तर भारतामधील एकमेव नागरी बँक म्हणून अर्बन बँकेला ३१ जुलै १९७९ पर्यत ओळखले जात होते. शेतकर्यांना गटवारीने आणि व्यक्तिश: संयुक्त जबाबदारीने कर्जाचे वितरण केले जायचे. तथापि जिल्ह्यात वारंवार पडणार्या भीषण दुष्काळामुळे कर्जाच्या वसुलीसाठी अनेक अडचणी निर्माण झाल्या. थकबाकीचे प्रमाण वाढले. अशा कर्जासाठी त्यावेळी शासनाकडून अर्थसहाय्य उपलब्ध होत नव्हते. सन १९२७-२८ मध्ये बँकेचे सदस्य, सहकार खाते, त्यावेळची मुंबई प्रांतिक सहकारी बँक यांच्या विचाराने व संमतीने बँकेने शेती कर्ज पुरवठय़ाचा व्यवहार प्रांतिक सहकारी बँकेकडे सुपूर्द केला. या बँकेचे कार्यक्षेत्र फक्त नागरी जनता आणि नागरी सोसायट्या पुरतेच र्मयादित झाले. जिल्हा स्तरावरून एकच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असावी,असा महाराष्ट्र शासनाने ३१ जुलै १९७९ रोजी आदेश काढला आणि अर्बन बँकेचा 'पूरक जिल्हा मध्यवर्ती बँक' हा दर्जा काढून घेतला.
■ कै. रावबहादूर चितळे, कै. भाऊसाहेब फिरोदिया, कै. गंगाधर शास्त्री गुणे, कै. मोतीलालजी फिरोदिया, कै. व्यं.श्री. चिंचोरकर, कै. मो. मु.बोरा, कै. डॉ. श्री. वि. निसळ, कै. नवनीतभाई बाश्रीकर, सुवालालजी गुंदेचा, कै. झुंबरलालजी सारडा, कै. य.कां. भालेराव, कै. हेमराजजी बोरा, कै. पेमराजजी मो. गुगळे, सुभाष भंडारी, अँड.अशोक कोठारी, उत्तमराव सुपेकर, कै. अंबादास कुलकर्णी, कै. कांतीलाल ओस्तवाल, विजयकुमार छाजेड, खासदार दिलीप गांधी, रमेश भळगट, अँड. अशोक बोरा, अशोक गुगळे, झुंबरलाल बोथरा, डॉ. पारस कोठारी, खासदार दिलीप गांधी.
■ १९३५ मध्ये प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ कै. प्रा. वा. गो. राळे यांच्या अध्यक्षतेखाली बँकेचा रौप्य महोत्सव थाटामाटात साजरा झाला.
■ २६ जून १९६0 रोजी महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री कै. यशवंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीत बँकेचा सुवर्ण महोत्सव साजरा झाला. या महोत्सवानिमित्त बँकेचा ५0 वर्षांचा सहकारी सेवा दर्शविणारा ग्रंथही प्रकाशित झाला.
■ ७ एप्रिल १९७0 रोजी बँकेचा हिरक महोत्सव साजरा झाला. या महोत्सवाला थोर देशभक्त अच्युतराव पटवर्धन यांची उपस्थिती होती. बँकेच्या अमृतमहोत्सवासाठी तत्कालीन मुख्यमंत्री कै. वसंतदादा पाटील यांची उपस्थिती होती.
■ २२ ऑक्टोबर १९३९ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री कै. बाळासाहेब खेर यांच्या हस्ते बँकेच्या मध्यवर्ती भागातील इमारतीचे उद््घाटन झाले.
■ ६ जानेवारी २000 च्या अधिसूचनेनुसार २९ जानेवारी २000 पासून भारतीय रिझर्व्ह बँकेने नगर अर्बन बँकेस शेड्युल्ड बँकेचा दर्जा दिला आहे.
■ ४ एप्रिल २0१३ पासून सेंट्रल रजिस्टार यांनी प्रमाणपत्राद्वारे बँकेस मल्टीस्टेटचा दर्जा प्रदान केला. संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार बहुराज्यीय सहकार कायद्यान्वये बँकेचा कारभार सुरू झाला. बँकेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्यासह गुजरात राज्य इतके विस्तारीत करण्यास रिझर्व्ह बँकेने अनुमती दिली.