जनसामान्यांचे असामान्य नेते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:21 IST2021-03-10T04:21:29+5:302021-03-10T04:21:29+5:30
एका प्राथमिक शिक्षकाच्या घरात जन्माला येऊनही शिक्षकाचा मुलगा म्हणून चाकोरीबद्ध जीवन न जगता सतत समाजासाठी काहीतरी देणं लागतो ही ...

जनसामान्यांचे असामान्य नेते
एका प्राथमिक शिक्षकाच्या घरात जन्माला येऊनही शिक्षकाचा मुलगा म्हणून चाकोरीबद्ध जीवन न जगता सतत समाजासाठी काहीतरी देणं लागतो ही भावना मनाला सतावत होती. त्यातूनच आजचे आमदार निलेश लंके घडले आहेत. हे काही एका ओळीत संपणारे नाही. त्यांचा आमदार होईपर्यंतचा प्रवास खूपच चमत्कारिक, नाट्यमय घडामोडींनी ओतप्रोत भरलेला आहे. त्यांनी आज जी जनसंपत्ती मिळविली आहे, त्यामागे अपार कष्ट, प्रचंड मेहनत, रात्रीचा दिवस करून लोकांच्या सुखदुखात सहभागी होणे आणि लोकांचा आधार बनल्याने त्यांच्याकडे जनसंपत्तीची रीघ लागली.
कार्यकर्ता प्रसंगी चुकीचा की बरोबर हे न तपासता आपला तळमळीचा कार्यकर्ता ह्या दृष्टीने जी मदत केली जाते, ती इतरत्र किंवा राजकारणात पहायला मिळणे दुरापास्तच आहे. जीवाचं रान करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यास शेवटचा आधार म्हणजे “नेता” होय. सर्व प्रयत्न करूनही एखादा प्रश्न मार्गी लागत नसल्यास त्यावर नेते काहीतरी उपाय काढतील हा जो विश्वास तयार झाला आहे, तो काही एक-दोन महिने किंवा वर्षात झालेला नाही. त्यासाठी गेल्या अनेक वर्षांची मेहनत आहे. त्यातूनच कार्यकर्ता व नेता असे एक चिरंजीव नातं तयार झाले आहे.
प्रसंगपरत्वे काहीजण थोडेसे नाराज होतात, काहीजण नवीन येऊन मिळतातही. परंतु नेता हे एक असे रसायन आहे की कोणाचा उपयोग कोणत्या ठिकाणी खुबीने करून घ्यावा हे कोणी सांगायची गरज नसते. या शिवाय अनेक कार्यकर्ते एकमेकांबद्दल नेत्यांना आवश्यकता नसताना काही ना काही खरे-खोटे सांगत असतात. परंतु नेत्यांनी ठरवलेले आहे, हे माझं कुटुंब आहे. थोड्याफार कुरबुरी चालूच राहणार. माझ्या कुटुंबात एकमेकांबद्दल आपुलकीची भावना राहिली पाहिजे. जे काही होईल ते चार भिंतीच्या आत. त्यावर समाधानकारक तोडगा काढण्यावर नेत्यांचा कटाक्ष राहिलेला आहे. जुना-नवा असा भेदाभेद न करता पक्ष बांधणीसाठी अपार कष्ट करण्याची तयारी ही महत्त्वाची भूमिका नेते घेत आहेत.
होतकरू विद्यार्थ्यांना, खेळाडूंना प्रोत्साहन, दिव्यांगांना सर्वोतोपरी मदत, महिला सक्षमीकरण आणि सामान्य माणसाला न्याय मिळवून देत मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हा केंद्रबिंदू मानून वाटचाल करत असताना प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा हा महत्वाचा प्रश्नदेखील नेत्यांना जटिल वाटेनासा झाला आहे. प्रत्येक अधिकाऱ्यास प्रेमाने आपुलकीने समजावून ‘‘माझ्यासाठी एवढं करा साहेब ’’ हे परवलीचे शब्दास्र वापरून अधिकाऱ्यांकडून सकारात्मक काम काढून घेण्यात नेते कमी पडत नाहीत.
कोरोनामुळे बरेच विकास कामांवर मर्यादा असतानासुद्धा मतदार संघासाठी तुलनेत भरीव निधी आणून विकास कामांची घोडदौड चालू आहे. भविष्यात अनेक विकास कामे प्रस्तावित आहेत. रस्ते, वीज पुरवठा, औद्योगिकीकरणासाठी विशेष प्राधान्य देण्यात येणार आहेच. महिलांसाठी नेते विशेष प्रयत्नशील असून त्या माध्यमातून लवकरच तांत्रिक प्रशिक्षण व रोजगार मिळवून देण्यासाठी कायम स्वरूपीचे अधिकृत केंद्र पारनेर मध्ये उभारण्याचा मानस आहे.
अनेक नातेवाईकांना नेत्यांबद्दल कुतूहल म्हणा किंवा तक्रार म्हटले तरी चालेल की नेते हे फक्त कार्यकर्त्यांची कामे करतात. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की रोज सकाळपासून रात्री २ -३ वाजेपर्यंत नेते सतत लोकांमध्ये असतात. कामाचे स्वरूप आपल्या कल्पनेपलीकडचे असते. आपण जर एक पूर्ण दिवस आमदारांसोबत गाडीमध्ये फिरलो तर लक्षात येते की किती फोन असतात, किती कामे असतात. फोन घेऊन आपलं डोकं गरगरून जाईल, अशी परिस्थिती असते. एवढी दगदग होते की दुसरे दिवशी परत सोबत जाण्याची इच्छा रहात नाही. परंतु आई मोहटादेवी, आई तुळजाभवानी, माँ वैष्णोदेवी यांच्या आशीर्वादाने नेत्यांचे शरीररुपी मशीन या सर्व कसोट्यांना पुरून उरतात. हे अखंड चाललेलं काम असेच जोमाने चालू रहावे.
या सर्व गोष्टींचा परिपाक म्हणूनच नेते आज राज्यात सर्वज्ञात होत आहेत. साधी रहाणी, जनतेशी अफाट संपर्क, कोण मध्य प्रदेशचा की उत्तर प्रदेशचा हे न बघता निरपेक्ष भावनेने केलेली मदत कोणीही विसरू शकणार नाही. आजही रात्रीबेरात्री रोडवर कोणी अडचणीत असेल तर स्वत: गाडी थांबवून आस्थेने विचारपूस करून त्या व्यक्तीची अडचण सोडविण्याचा मनापासून नेते प्रयत्न करतात. लॉकडाऊन काळात चालवलेलं अन्नछत्र राज्यात एक मैलाचा दगड अशी कामगिरी ठरलेली आहे.
या सर्व गोष्टींची दखल घेऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे सर्व कुटुंब आमदार निलेश लंके यांना सर्वतोपरी मदत करत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे हे अधिकाराने काम घेऊन ये, तुझ्या कामाला प्रथम प्राधान्य राहील असे आवर्जून सांगत असतात. मंत्री जयंत पाटील, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना निलेश लंके यांच्याबद्दल विशेष आपुलकी आहे. असा हा अवलिया जनतेच्या अफाट प्रेमातून उतराई होण्याचा रात्रंदिवस प्रयत्न करत राहीलच. ही विकास प्रक्रिया अखंड चालू राहण्यासाठी नेत्यांना भरपूर असे निरोगी आयुष्य लाभावे हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना.
- प्रा. संजय लाकूडझोडे पाटील, शिरूर