‘दिल की बात’ समजून घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2016 14:15 IST2016-03-13T14:09:50+5:302016-03-13T14:15:29+5:30

शिर्डी : मन की बात जाऊ द्या, ती मतांसाठी आहे. आपण मात्र लोकांच्या दिल की बात समजावून घ्या, जनतेत जाऊन त्यांचे प्रश्न समजावून घेत त्यांच्यासाठी एकत्रितपणे आंदोलन करावे लागेल,

Understand 'the heart's talk' | ‘दिल की बात’ समजून घ्या

‘दिल की बात’ समजून घ्या

शिर्डी : मन की बात जाऊ द्या, ती मतांसाठी आहे. आपण मात्र लोकांच्या दिल की बात समजावून घ्या, जनतेत जाऊन त्यांचे प्रश्न समजावून घेत त्यांच्यासाठी एकत्रितपणे आंदोलन करावे लागेल, असा सल्ला देत सध्या भाजपा व संघावाले मेक इन इंडियाच्या नावाखाली देशात असहिष्णुतेचे वातावरण निर्माण करीत आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी शिर्डीत केली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने आयोजित केलेल्या दोन दिवसीय पदाधिकारी प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन चव्हाण यांच्या हस्ते व राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली झाले़ यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, प्रदेश महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चारूलता टोपस, खासदार रजनी पाटील, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजीत कदम, माजी मंत्री वर्षा गायकवाड, आमदार अमिता चव्हाण, आमदार निर्मला गावीत, आमदार प्रणिती शिंदे, जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे, माजी मंत्री शोभा बच्छाव, कमलताई व्यवहारे, काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कांचन मांढरे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांच्यासह राज्यातील महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्या व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात थोरात गटाची मात्र अनुपस्थिती जाणवली़
भाजपा सरकार देशात भितीचे वातावरण निर्माण करून आपली वोट बँक निर्माण करत असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला़ भाजपा सरकार बकवास असून गरिबांचे व विद्यार्थ्यांचा आवाज चिरडून टाकणाऱ्या या सरकार विरोधात एकत्रित रान उठवावे लागेल़ पुढील वर्षी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एकत्रित तयारीला लागावे. त्यासाठी पक्षाचे जनसंपर्क अभियान गावपातळीवर नेवून सामान्य लोकांशी संवाद साधावा, असे आवाहनही त्यांनी केले़ देशाला आज मेक इन इंडिया नव्हे तर लव्ह इंडियाची गरज आहे, असे ते म्हणाले. यावेळी हर्षवर्धन पाटील, विश्वजित कदम, रजनी पाटील यांचीही भाषणे झाली. प्रास्ताविक प्रदेशाध्यक्षा चारुलता टोकस यांनी केले़
(तालुका प्रतिनिधी)
विखे यांनी सरकारचे अपयश व नाकर्तेपणा राज्याला अधोगतीकडे नेत असल्याचा व जनतेला वाऱ्यावर सोडल्याचा आरोप करीत काँगे्रस पदाधिकाऱ्यांनी जनतेच्या समस्या समजावून घेऊन काम करण्याचा सल्ला दिला़ सरकारकडून घोषणांचा पाऊस सुरू असून काँग्रेसला पर्याय निर्माण होऊ शकत नाही़ काँग्रेसच अच्छे दिन आणू शकते, असा विश्वास विखे यांनी व्यक्त केला़

Web Title: Understand 'the heart's talk'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.