वीजबिलाची एकरकमी थकबाकी भरणे अशक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:20 IST2021-02-14T04:20:37+5:302021-02-14T04:20:37+5:30
दहिगावने : महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वीजबिल वसुलीसाठी मेळावे घेणे, माहिती देणे, वसुलीसाठी आग्रही भूमिका घेणे हा कामकाजाचा भाग आहे. ...

वीजबिलाची एकरकमी थकबाकी भरणे अशक्य
दहिगावने : महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वीजबिल वसुलीसाठी मेळावे घेणे, माहिती देणे, वसुलीसाठी आग्रही भूमिका घेणे हा कामकाजाचा भाग आहे. या गोष्टींना शेतकऱ्यांचा विरोध नाही. एकरकमी वीजबिल भरा, अशी अधिकाऱ्यांची भूमिका असेल तर ते आर्थिक अडचणीतील शेतकऱ्यांना अशक्य आहे. सध्या पिके जोमात आहेत. अशात कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित केला तर शेतकऱ्यांच्या भावनेचा उद्रेक होईल, असे परखड मत भावीनिमगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
भावीनिमगाव (ता. शेवगाव) येथे कृषिपंप वीज धोरण २०२०ची माहिती देण्यासाठी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.
भातकुडगाव कक्षाचे सहायक अभियंता पीयूष पाडवी, ग्रामीण विभागाचे नजन, वरिष्ठ तंत्रज्ञ सुनील गुळमकर यांनी वीज धोरणाची सविस्तर माहिती दिली. शेतकऱ्यांनी यातील काही नियमांना विरोध करत अतिवृष्टीचे अनुदान शुक्रवार (दि.२६) पर्यंत बँकेत जमा होईल. त्यानंतर प्रत्येक शेतकरी थोडीफार बाकी भरून महावितरण कंपनीस सहकार्य करण्यास तयार आहे, अशी भूमिका घेतली. मात्र पाडवी यांनी सोमवार (दि.१५) पर्यंत काही शेतकऱ्यांनी वसूल दिला तर ठीक नाही तर वीजपुरवठा खंडित केला जाईल, अशी भूमिका घेतली. त्यामुळे उपस्थित शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनावले.
यावेळी सरपंच आबासाहेब काळे, उपसरपंच संतोष चव्हाण, माजी सरपंच कचरू शेळके, भाऊसाहेब घनवट, सेवा संस्थेचे संचालक तुकाराम चेडे, ग्रामपंचायत सदस्य नीलेश कुंभकर्ण, शरद शेळके, हरी करवंदे, झुंबर चव्हाण, विलास मरकड, रघुनाथ गादे आदींसह शेतकरी उपस्थित होते.
---
लॉकडाऊनमुळे मातीमोल झालेला भाजीपाला, शेतीमालाचे पडलेले दर, अतिवृष्टीने झालेले नुकसान, त्यात ऊसतोडणीसाठी होत असलेला विलंब या बाबींकडेही सहानुभूतीपूर्वक पाहणे गरजेचे आहे.
-आबासाहेब काळे,
सरपंच, भावीनिमगाव