मुलाला कॉपी देण्यासाठी निलंबित नायब तहसीलदार परीक्षा केंद्रावर, पाथर्डी तालुक्यातील तनपूरवाडी परीक्षा केंद्रावरील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 21:54 IST2025-02-27T21:53:48+5:302025-02-27T21:54:10+5:30
Ahilyanagar News: बारावीच्या परीक्षेदरम्यान नायब तहसीलदार आहे, असे भासवून निलंबित नायब तहसीलदार याने मुलाला कॉपी पुरविण्याच्या उद्देशाने तालुक्यातील तनपूरवाडी येथील परीक्षा केंद्रावर अनधिकृतपणे प्रवेश मिळविला.

मुलाला कॉपी देण्यासाठी निलंबित नायब तहसीलदार परीक्षा केंद्रावर, पाथर्डी तालुक्यातील तनपूरवाडी परीक्षा केंद्रावरील प्रकार
अहिल्यानगर - बारावीच्या परीक्षेदरम्यान नायब तहसीलदार आहे, असे भासवून निलंबित नायब तहसीलदार याने मुलाला कॉपी पुरविण्याच्या उद्देशाने तालुक्यातील तनपूरवाडी येथील परीक्षा केंद्रावर अनधिकृतपणे प्रवेश मिळविला. गुरुवारी परीक्षा केंद्रावर त्याचे बिंग फुटले. त्याच्यावर गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलिस ठाण्यात सुरू होती.
तनपूरवाडी परीक्षा केंद्राचे केंद्र संचालक शिवाजी दळे यांनी याबाबतची फिर्याद पाथर्डी पोलिस ठाण्यात दिली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी या निलंबित नायब तहसीलदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू केले होते. बारावीच्या पहिल्या पेपरपासून शासनाचे ओळखपत्र घालून हा इसम नायब तहसीलदार आहे, असे भासवून भगवानबाबा उच्च माध्यमिक विद्यालय, तनपूरवाडी या केंद्रावर येत होता. याच केंद्रावर त्याचा मुलगा १२वी विज्ञानची परीक्षा देत होता. त्याला कॉपी पुरविण्याच्या उद्देशाने तो हा परीक्षा केंद्रावर असायचा. याबाबत त्या केंद्रावर असलेल्या एका पर्यवेक्षकाने सांगितले की, गळ्यात शासनाचे ओळखपत्र घालून हा इसम परीक्षेच्या वेळेत केंद्रावर बिनधास्तपणे वावरत होता. तसेच काही शिक्षकांना मी बैठे पथकातील अधिकारी असल्याचे सांगत होता. गळ्यात शासनाचे ओळखपत्र असल्यामुळे तेथे नियुक्तीवर असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्याला हटकलेसुद्धा नाही. गुरुवारी त्याचे बिंग फुटले.