दोन वर्षे सैनिक प्रशिक्षण सक्तीचे करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:25 IST2021-08-21T04:25:09+5:302021-08-21T04:25:09+5:30
अकोले : लहानपणापासून कुस्ती, कबड्डी खेळाची आवड. काॅलेजमधील एनसीसी प्रशिक्षण भारतीय सैनिक सेवेत घेऊन गेले. प्रत्येक भारतीयाला किमान दोन ...

दोन वर्षे सैनिक प्रशिक्षण सक्तीचे करावे
अकोले : लहानपणापासून कुस्ती, कबड्डी खेळाची आवड. काॅलेजमधील एनसीसी प्रशिक्षण भारतीय सैनिक सेवेत घेऊन गेले. प्रत्येक भारतीयाला किमान दोन वर्षे सैनिक प्रशिक्षण सक्तीचे केल्यास शिस्तबद्ध पिढी तयार होण्यास मदत होईल. स्वयंशिस्त अंगीकारली जाईल, मग भविष्यात येणाऱ्या महामारीचा सामना करण्यासाठी नागरिक अधिक सजग होतील, असे मत माजी सैनिक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुभेदार भास्कर तळेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
कारगील युध्दावेळी मिळालेले पदक ते अभिमानाने दाखवतात. १९ आर. आर .राष्ट्रीय रायफल युनिट, आतंकवादीविरोधी पथकात श्रीनगरपासून १०० किमी अंतरावर कंगण या सीमाक्षेत्र भागात तेव्हा तळेकरांची ड्युटी होती. ५ जुलै १९९९ कारगीलच्या वेळी सीमेवर लेह, लडाख युध्दाच्या ठिकाणी सैनिक सुखरूप पोहोचविण्याची रस्ता सुरक्षा जबाबदारी या पथकाकडे होती. कारगील युध्द जवळून अनुभवतानाच बिहार नागा बटालियनला सहकार्य करताना कारगीलमध्ये सहभागी होता आले, असे ते अभिमानाने सांगतात.
लहानपणापासून कुस्ती, कबड्डी खेळाची आवड होती. अकोले महाविद्यालय असताना कबड्डी संघाचे नेतृत्व त्यांच्याकडे होते. काॅलेजमधे दोन वर्षांचे एनसीसी प्रशिक्षण लाभदायक ठरले. सप्टेंबर १९८३ भारतीय सैनिक सेवेत लिपिक या पदासाठी त्यांची निवड झाली. सैनिक सेवेत भरती झाल्यावर सर्वांना बेसिक ट्रेनिंग सारखेच दिले जाते.
वयाच्या २१ वर्षांपर्यंत सैन्यात भरती होता येते. तळेकर हे उशिरा २२ व्या वर्षांनंतर लिपिक म्हणून सैन्यात भरती झाले. परीक्षा देऊन ते सुभेदारपदापर्यंत पोहोचले. २८ वर्षे सैन्यात सेवा केल्यानंतर ५० व्या वर्षी २०११ ला ते सेवानिवृत्त झाले. त्यानंतर सात वर्षे प्रवरा रुग्णालयात लोणी येथे मुख्य सुरक्षा अधिकारी म्हणून काम केले. आता सेवानिवृत्त होऊन ते माजी सैनिक संघटनेची तालुकाध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत.
नाशिक येथे युध्द कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर लिपिक प्रशिक्षण तळेकर यांनी औरंगाबाद येथे पूर्ण केले. १९८५ ला नागपूर कामठी येथे त्यांची पहिली पोस्टिंग झाली. पुढे नशेराबाद राजस्थान, पोखरण रेंज अणू चाचणी केंद्राजवळ, नंतर पंजाब फिरोजपूर येथे ओपी रक्षकदल खलिस्थान उग्रवादीविरोधी पथकात, जम्मू काश्मीर भागात कटवा, पठाणकोट येथे हिरानगर बोर्डरवर आतंकवादीविरोधी पथकात, मग नाशिक येथे रेकाॅर्ड रूम येथे, आसाम ओपी रेन्यूओ बोडो आतंकवादीविरुध्द पथकात १९९६ साली बारामुल्ला, कुपवाडा येथे ते सेवेत होते.
त्यांना दोन मुली, मुलगा असे तीन अपत्य असून, मुलगा व मुलगी आयटी इंजिनिअर आहेत. एक मुलगी शिक्षिका आहे. पत्नी आशा हिची खंबीर साथ मिळाल्याने मुलांचे चांगले शिक्षण झाल्याचे तळेकर सांगतात. ३१ मे २०११ रोजी सुभेदारपदावरून ते सेवानिवृत्त झाले. तालुक्यातील हुतात्मा स्मारकांचे सुशोभीकरण व तेथून सैनिक भरती मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे.