दोन घरांवर चोरट्यांचा डल्ला; चार लाखाचा ऐवज लंपास
By Admin | Updated: April 29, 2017 14:07 IST2017-04-29T13:52:21+5:302017-04-29T14:07:16+5:30
खामगाव येथे आसणे वस्तीवर दोन घरांवर चोरट्यांनी डल्ला मारुन तब्बल चार लाखांचा ऐवज चोरुन पोबारा केला़

दोन घरांवर चोरट्यांचा डल्ला; चार लाखाचा ऐवज लंपास
आॅनलाइन लोकमत
नेवासा (अहमदनगर), दि़ 29 - नेवासा तालुक्यातील खामगाव येथे आसणे वस्तीवर दोन घरांवर चोरट्यांनी डल्ला मारुन तब्बल चार लाखांचा ऐवज चोरुन पोबारा केला़ ही घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली़
तालुक्यातील खामगाव येथे आसणे वस्तीवरील दत्तात्रय श्रीरंग आसणे हे गुरुवारी रात्री त्यांच्या घराचा दरवाजा लोटून घेत बाहेर पत्नी द्वारका, मुलगा प्रविण यांच्यासह झोपले होते़ पहाटे चार वाजण्याच्या सुमारास त्यांची पत्नी द्वारका यांना जाग आली़ त्यावेळी त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला़ त्यांनी घरात डोकावून पाहिले असता घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले़ चोरट्यांनी घरात उचकापाचक करून पत्र्याची पेटी घेवून पोबारा केला होता. या पेटीत दीड लाख रुपये व द्वारका यांचे साडेपाच तोळे सोन्याचे दागिने असा सुमारे ३ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज होता़ आसणे यांनी परिसरातील लोकांना बोलावून घटनेबद्दल सांगितले़ लोकांनी परिसरात शोध घेतला असता एका उसाच्या शेतामध्ये पत्र्याची रिकामी पेटी आढळून आली़ मात्र, त्यात पैसे किंवा दागिने यापैकी काहीच नव्हते़
दरम्यान बाळासाहेब रामनाथ आसणे यांच्या घरीही चोरी झाल्याचे आसणे यांनी सांगितले़ बाळासाहेब आसणे यांच्या घरातूनही चोरट्यांनी ६० हजार रुपयांचा ऐवज लांबविला़ दत्तात्रय श्रीरंग आसणे यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़ या परिसरातून एकाच रात्रीत ३ लाख ९० हजार रुपयांचा ऐजव चोरीला गेल्यामुळे परिसरात घबराट पसरली आहे़