खानापूर येथे दोन बिबट्यांची झुंज; एक गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 16:14 IST2020-09-27T16:13:25+5:302020-09-27T16:14:09+5:30
श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर येथे दोन बिबट्याने घासाच्या पिकात डरकाळ्या फोडत एकमेकांवर हल्ला चढविला. यात गंभीर जखमी झालेल्या बिबट्याला वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेतले.

खानापूर येथे दोन बिबट्यांची झुंज; एक गंभीर जखमी
श्रीरामपूर : तालुक्यातील खानापूर येथे दोन बिबट्याने घासाच्या पिकात डरकाळ्या फोडत एकमेकांवर हल्ला चढविला. यात गंभीर जखमी झालेल्या बिबट्यालावनविभागाच्या पथकाने ताब्यात घेतले.
खानापूर शिवारात हरिभाऊ भानुदास आदिक यांच्या वस्तीवर शनिवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. एका बिबट्याने दुसºयाच्या डोक्यावर पंजाचा जोरदार प्रहार केल्याने बिबट्या रक्तबंबाळ होऊन बेशुुद्ध झाला. हल्लेखोर बिबट्या ग्रामस्थांच्या आरडाओरड्याने उसाच्या शेतात पळून गेला.
जनावरांच्या गोठ्यामध्ये बेशुद्ध स्थितीत पडलेल्या बिबट्याला पाहून हरिभाऊ यांनी तातडीने थोरले बंधू कचरू आदिकयांच्यासह पोलीस पाटील संजय आदिक यांना माहिती दिली. त्यानंतर बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली.
नगर येथील उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, सहवन संरक्षक देवखिळे, वनपाल बी. एस. गाढे, बी. बी. सुरासे, एस. एम लांडे, वनमित्र शरद आसने यांनी बिबट्यास उपचारासाठी श्रीरामपूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात नेले. तेथे त्याच्यावर उपचार करण्यात आले. मात्र प्रकृतीत सुधारणा जाणवत नसल्याने त्यास रविवारी नगर येथे हलविण्यात आले.