दोन लाख भाकरी तर ७० कढईत केला आमटीचा महाप्रसाद, रंगदास स्वामींच्या महाप्रसादाची १३८ वर्षांची परंपरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 13:55 IST2025-01-02T13:54:42+5:302025-01-02T13:55:11+5:30
आणे या गावच्या यात्रोत्सवाची ही १३८ वर्षांची परंपरा आहे. नववर्षाच्या प्रारंभी रंगदास स्वामी पुण्यतिथीनिमित्त वार्षिक यात्रोत्सव आयोजित करण्यात येतो.

दोन लाख भाकरी तर ७० कढईत केला आमटीचा महाप्रसाद, रंगदास स्वामींच्या महाप्रसादाची १३८ वर्षांची परंपरा
शरद झावरे -
पारनेर (जि. अहिल्यानगर) : जुन्नर हद्दीवर असणारा जुन्नर तालुक्यातील आणे येथील श्रीरंगदास स्वामी पुण्यतिथीनिमित्त आयोजित वार्षिक यात्रोत्सव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. श्रीरंगास्वामींच्या पुण्यतिथीनिमित्ताने नगर-पुणे-नाशिक-ठाणे-मुंबईसह महाराष्ट्रातून आलेल्या लाखो भाविकांसाठी २ लाख भाकरी तर ७० जम्बो कढयांमध्ये तयार केलेला आमटीचा महाप्रसाद बनविण्यात आला होता.
आणे या गावच्या यात्रोत्सवाची ही १३८ वर्षांची परंपरा आहे. नववर्षाच्या प्रारंभी रंगदास स्वामी पुण्यतिथीनिमित्त वार्षिक यात्रोत्सव आयोजित करण्यात येतो.
आमटी -भाकरीच्या महाप्रसादामुळे येथील यात्रा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. अन्नदात्यांच्या माध्यमातून ७० जम्बो कढई आमटी (३५ हजार लिटर) तर २ लाख भाकरी महाप्रसादासाठी बनविण्यात आल्या होत्या. १० लाख रुपयांचा मसाला दानशूर अन्नदात्यांच्या माध्यमातून या आमटीसाठी पुरविण्यात आला. या उत्सवाची राज्यात ख्याती आहे.
२०३४ पर्यंत आमटी अन्नदात्याचे बुकिंग...
या आमटीच्या महाप्रसादासाठी सन २०३४ पर्यंत अन्नदात्यांचे बुकिंग झाले असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष मधुकर दाते, सरपंच प्रियांका दाते दिली आहे.
आणे गावात लाखो भाविक या वार्षिक यात्रोत्सवात येतात. १३८ वर्षांची आमटी-भाकरीची परंपरा आजही ग्रामस्थांनी अविरतपणे चालू ठेवली आहे. याचे उत्तम व आदर्श नियोजन देवस्थान व ग्रामस्थांनी केलेले आहे.
- आमदार काशिनाथ दाते, आमदार शरद सोनवणे