बिबट्याच्या हल्यात दोन जखमी; तीन गायींवरही हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 13:36 IST2020-12-08T13:35:16+5:302020-12-08T13:36:23+5:30
बिबट्याने हल्ला करुन दोन व्यक्ती व तीन गायींना जखमी केल्याची घटना राहुरी तालुक्यातील चिखलठाण गावातील बुळे पठार येथे सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली.

बिबट्याच्या हल्यात दोन जखमी; तीन गायींवरही हल्ला
अहमदनगर/ म्हैसगाव : बिबट्याने हल्ला करुन दोन व्यक्ती व तीन गायींना जखमी केल्याची घटना राहुरी तालुक्यातील चिखलठाण गावातील बुळे पठार येथे सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली.
मच्छिंद्र दुधावडे, तावजी केदार अशी बिबट्याच्या हल्यात जखमी झालेल्यांची नावे आहेत. घरासमोर बांधलेल्या पाळीव गायावर बिबट्याने हल्ला केला. या हल्याने गायींचा व महिलांचा ओरडण्याचा आवाज आला. आवाज ऐकून शाळेजवळ शेकत असलेले मच्छिंद्र दुधावडे हे घराकडे आले. त्यांनी मोबाईलच्या उजेडात बिबट्या गायींवर हल्ला करीत असल्याचे पाहिले. त्यांनी आरडाओरडा करून त्यांनी बिबट्याला पळवून लावले.
या दरम्यान घरातुन बॅटरी घेवून उजेडात बिबट्या कुठे दिसतो काय? हे पाहत असताना बिबट्याने मागे फिरुन दुधावडे यांच्यावर हल्ला केला. प्रसंगअवधान राखत त्यांनी हात पुढे करून छातीवर होणार हल्ला हातावर घेतला. त्यांचा हाताला बिबट्याने जोरदार चावत हात पकडून ठेवला. त्याही परिस्थितीमध्ये दुधावडे यांनी बिबट्याची मान एका हाताने दाबत जबड्यातील हात मोकळा करुन घेतला. संधी मिळताच दुधावडे यांनी जीव वाचवून घरात गेले. याच आवाजाने जवळ राहणारे तावजी केदार मदतीसाठी येत असताना बिबटयाने त्यांच्यावरही हल्ला केला. त्यांच्या पोटालाही जखमा झाल्या.
हल्ल्यात जखमींवर ताहराबाद येथे डॉ. जालिंदर घिगे यांनी जखमीवर प्रथम उपचार केले. मंगळवारी सकाळी रुग्णालय उघडल्यावर पुढील उपचार करण्यात आले.