संगमनेरात दोन गटांमध्ये धुमश्चक्री
By Admin | Updated: April 20, 2016 00:09 IST2016-04-20T00:06:31+5:302016-04-20T00:09:59+5:30
संगमनेर : मागील भांडणाच्या कारणावरून दोन गटात झालेल्या प्रचंड धुमश्चक्रीत तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना शहरातील जेधे कॉलनीत घडली.

संगमनेरात दोन गटांमध्ये धुमश्चक्री
संगमनेर : मागील भांडणाच्या कारणावरून दोन गटात झालेल्या प्रचंड धुमश्चक्रीत तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना शहरातील जेधे कॉलनीत घडली. याप्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीवरून शहर पोलिसांनी दोन्ही गटाच्या एकूण १० जणांविरूध्द गुन्हा दाखल करून एकास अटक केली आहे.
शहरातील जेधे व कतारी यांच्या दोन गटामध्ये काही दिवसांपूर्वी भांडणे व हाणामाऱ्या झाल्या होत्या. मागील भांडणाचा राग मनात धरून सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पुन्हा संजय गांधीनगरमधील अर्जुन सुरेश कतारी, करण मच्छिंद्र कतारी, सचिन प्रताप कतारी, मनोहर सुवा जाधव व गौतम कतारी यांनी संगनमताने अनिकेत गणेश जेधे (वय १६) यास लोखंडी गज व लाकडी दांडक्याने जबर मारहाण करून गंभीर जखमी केले. तर अर्जुन कतारी व मनोहर जाधव हे शनी मंदिरातून देवदर्शन घेवून घरी परत येत असताना जेधे कॉलनीमधील आकाश जेधे, अंकुश जेधे, अविनाश जेधे, अनिकेत जेधे व योगेश जेधे यांनी लाकडी बॅट व स्टम्पने कतारी व जाधव यांना जबर मारहाण करून गंभीर जखमी केले. हा प्रकार जेधे कॉलनीत घडला. याप्रकरणी अनुक्रमे सविता गणेश जेधे व अर्जुन कतारी यांनी परस्पर विरोधी फिर्याद दिली. त्यावरून शहर पोलिसांनी वरील दोन्ही गटाच्या एकूण १० जणांविरूध्द जीवे मारण्याचा कट, हाणामारी व गंभीर दुखापत करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत. तर गौतम कतारी यास पोलिसांनी अटक केली असून उर्वरित आरोपी फरार झाले आहेत. पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक विनय सरवदे करीत आहेत.
(प्रतिनिधी)