वाहनाखाली झोपलेल्या दोन बालकांचा चिरडून मृत्यू
By सुदाम देशमुख | Updated: April 17, 2023 10:40 IST2023-04-17T10:40:09+5:302023-04-17T10:40:57+5:30
प्राथमिक माहिती नुसार तर दोन्ही मुले मध्यप्रदेश येथील असल्याची माहिती कळत आहे.

वाहनाखाली झोपलेल्या दोन बालकांचा चिरडून मृत्यू
शेवगाव (जि. अहमदनगर): तालुक्यातील तळणी शिवारातील एका जिनिंग प्रेसमध्ये काम करणाऱ्या कामगाराच्या, दोन मुलांचा वाहनाखाली चिरडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तळणी शिवारातील एका जीनिंग मिल मध्ये काम करणाऱ्या कामगाराचे मुल तिथे उभ्या असलेल्या वाहनाखाली झोपले होते. ही बाब चालकाच्या लक्षात आली नाही. तो वाहन सुरु करुन निघाला असता गाडी खाली झोपलेले सुमारे चार व पाच वर्षाच्या, अश्या दोन चिमुकल्या मुलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर जमाव संतप्त झाला असून, आम्हाला आमची मुले द्या असे म्हणत जमावाने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
घटनास्थळी पोलिस निरीक्षक विलास पुजारी व त्यांचे पथक तात्काळ दाखल झाले असून संतप्त जमावाची पोलिसांकडून समजूत काढली जाते आहे. घटनास्थळी जमावाने जाण्यास मज्जाव केल्याने, मुलांची नावे व निश्चित वय समजू शकले नाही, अशी माहिती पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी दिली आहे. प्राथमिक माहिती नुसार तर दोन्ही मुले मध्यप्रदेश येथील असल्याची माहिती कळत आहे.