विजेचा शॉक बसल्याने दोन बैलांचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 13:44 IST2024-06-21T13:43:57+5:302024-06-21T13:44:13+5:30
तातडीने घटनेचा पंचनामा करुन संबधीत विभागाकडून या शेतकर्यास आर्थिक मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

विजेचा शॉक बसल्याने दोन बैलांचा जागीच मृत्यू
- अशोक निमोणकर
जामखेड - शेतातील काम आटोपून बैलगाडीतून पती-पत्नी घरी परतत असताना रस्त्यातील पाण्यात विद्युत पोलचा वीजप्रवाह उतरल्याने बैलगाडीच्या बैलांना विजेचा शॉक बसला. यामध्ये दोन्ही बैलांचा जागीच मृत्यू झाला. बैलाच्या खांद्यावर असलेले जू लोखंडी असल्याने प्रसंगावधान राखून बैलगाडीत बसलेल्या पती व पत्नीने उडी मारल्याने ते या अपघातातून वाचले. सदर घटना गुरुवारी दि २० जुन रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास जामखेड तालुक्यातील वाघा गावात घडली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, वाघा गावातील शेतकरी सुखदेव बबन बारस्कर हे आपल्या पत्नीसह बैलगाडीतून सकाळी शेतात गेले होते. दिवसभरातील शेतातील काम आटोपले असताना पाऊस सुरू झाला होता. बैलगाडीत गवताचे भारे टाकुन पती पत्नी हे बैलगाडीतून आपल्या घरी येत असतानाच वाघा गावात एका लाईटच्या पोलचा वीजप्रवाह पावसाने रस्त्यावर साठलेल्या पाण्यात उतरला होता.
या सुमारास बैलगाडी या पाण्यातून जात असतानाच अचानक या बैलांना विजेचा धक्का बसला. त्यामुळे बैलांचा जागीच मृत्यू झाला तर प्रसंगावधान राखून बैलगाडी मध्ये गवताच्या वरती बसलेल्या पती-पत्नी यांनी गाडीतून बाहेर उड्या मारल्याने ते या अपघातून वाचले आहेत. याबाबत शेतकर्याच्या दोन्ही बैलांचा या अपघातात दुर्दैवी मुत्यू झाला आहे. यामध्ये शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असल्याने तातडीने घटनेचा पंचनामा करुन संबधीत विभागाकडून या शेतकर्यास आर्थिक मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थाकडुन होत आहे.