गाढवे चोरणारे दोन आरोपी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:20 IST2021-04-18T04:20:47+5:302021-04-18T04:20:47+5:30
श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील रवींद्र अंबादास बोरुडे हे गाढवांद्वारे माती वाहतूक करतात. या कामाकरिता त्यांच्याकडे काही गाढवे होती. राहुरी ...

गाढवे चोरणारे दोन आरोपी गजाआड
श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील रवींद्र अंबादास बोरुडे हे गाढवांद्वारे माती वाहतूक करतात. या कामाकरिता त्यांच्याकडे काही गाढवे होती. राहुरी तालुक्यातील पाथरे येथे माती वाहतूक करण्याचे काम त्यांनी घेतले होते. त्यासाठी आठ गाढवे घेऊन रवींद्र बोरुडे हे पाथरे गावात गेले. १६ मार्चला माती वाहतूक केल्यानंतर बोरुडे यांनी आठही गाढवांच्या पायाला दोरी बांधून ती गावातील मंदिरासमोर बांधली, त्यानंतर ४ वाजता ते बेलापुरला घरी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळीच कामाकरिता पाथरे येथे आले, तर त्यांना बांधलेल्या ठिकाणी गाढवे दिसली नाहीत. बोरुडे यांनी परिसरात गाढवांचा शोध घेतला. मात्र, गाढवे मिळून आली नाहीत. गाढवे न सापडल्यामुळे बोरुडे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या घटनेचा तपास पोलीस नाईक दिनकर चव्हाण हे करत होते. गुन्ह्यातील आरोपीची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर पोलीस पथकाने पंढरपूर येथे जाऊन आजिनाथ कोंडिराम जाधव (वय २९ वर्षे, पंढरपूर, जि. सोलापूर) यास शिताफीने ताब्यात घेऊन गजाआड केले. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता दुसरा आरोपी आविनाश ऊर्फ सोनू बाबासाहेब बोरुडे (वय २६, रा. बेलापूर बुद्रुक, ता. श्रीरामपूर) याच्या मदतीने गाढवांची चोरी केल्याचे उघड झाले. दोन्ही आरोपींना अटक करत सहा गाढवेही पोलिसांनी जप्त केली.