खूनप्रकरणी दोघा आरोपींना जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:21 IST2021-04-02T04:21:06+5:302021-04-02T04:21:06+5:30
परमेश्वर पूनमसिंह भोंड व लक्ष्मण किसन कांबळे, अशी जन्मठेप झालेल्या आरोपींची नावे आहेत, तर कृष्णा पूनमसिंह भोंड हा खटल्यादरम्यान ...

खूनप्रकरणी दोघा आरोपींना जन्मठेप
परमेश्वर पूनमसिंह भोंड व लक्ष्मण किसन कांबळे, अशी जन्मठेप झालेल्या आरोपींची नावे आहेत, तर कृष्णा पूनमसिंह भोंड हा खटल्यादरम्यान मयत झाला. ७ ऑगस्ट २०१९ रोजी शेवगाव- पाथर्डी रोडवरील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण महाविद्यालयासमोर राहत असलेल्या एका महिलेच्या पालावर मयत बापूसाहेब घनवट हे रात्री गेले असता त्याठिकाणी असलेल्या आरोपी परमेश्वर भोंड, कृष्णा भोंड व लक्ष्मण कांबळे यांनी बापूसाहेब घनवट यांना महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून मारहाण केली, तसेच लोखंडी हत्याराने त्यांचा खून केला. याप्रकरणी घनवट यांचे भाऊ काकासाहेब घनवट यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी याप्रकरणी भारतीय दंड विधान कलम ३०२, २०१, ५०६ सह ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. या खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश अशोककुमार भिलारे यांच्यासमोर झाली. खटल्याच्या सुनावणीदरम्यान तिन्ही आरोपी तुरुंगात होते. खटल्याच्या निकालापूर्वी आरोपी कृष्णा भोंड हा मयत झाला. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. अतिरिक्त सरकारी वकील अनिल सरोदे यांनी न्यायालयासमोर आलेल्या परिस्थितीजन्य पुराव्याद्वारे युक्तिवाद केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने दोन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी अकरा हजार रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास सात महिने सश्रम कारावास, अशी शिक्षा ठोठावली.