कर्जत : मिरजगाव जिल्हा परिषद शाळेतून टीव्ही संचाची चोरी करणाऱ्या चौघांना कर्जत पोलिसांनी जेरबंद केले. बेलगाव येथून तो संचही ताब्यात घेण्यात आला.
मिरजगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील अंदाजे १ लाख रुपयांचा एलईडी टीव्ही संच ३ ऑगस्ट रोजी चोरीस गेला होता. शाळेतील डिजिटल रूमचा दरवाजा तोडून ही चाेरी झाली होती. हा टीव्ही संच आमदार रोहित पवार यांनी दिला होता. या प्रकरणाचा कर्जत पोलिसांनी बारकाईने तपास केला. स्वप्नील गायकवाड याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने ही चोरी केल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी लागलीच त्याचा शोध सुरू केला. स्वप्नील गायकवाड (रा. बेलगाव, ता. कर्जत) पोलिसांच्या कचाट्यात सापडला. त्याकडे अधिक तपास केला असता या गुन्ह्यात गणेश निंबाळकर (वय २५), निखिल पवार (वय २४), शुभम ऊर्फ भुंग्या गायकवाड (वय २४) या साथीदारांचा सहभाग असल्याची कबुली दिली. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे, हेडकॉन्स्टेबल प्रबोध हांचे आदींनी केली.