साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अडचणीत

By Admin | Updated: July 27, 2014 01:09 IST2014-07-26T23:27:42+5:302014-07-27T01:09:17+5:30

अहमदनगर : जुलै महिना संपत आला तरी जिल्ह्यात पाऊस पडण्याची लक्षणे नाहीत. आधीच टंचाईची परिस्थिती असताना जिल्ह्यात उसाच्या क्षेत्रासोबत उत्पादनही घटलेले आहे.

Turning Season During Sugarcane Crops | साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अडचणीत

साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अडचणीत

अहमदनगर : जुलै महिना संपत आला तरी जिल्ह्यात पाऊस पडण्याची लक्षणे नाहीत. आधीच टंचाईची परिस्थिती असताना जिल्ह्यात उसाच्या क्षेत्रासोबत उत्पादनही घटलेले आहे. त्याचा चाऱ्यासाठी सर्रास वापर होत असल्याने उपलब्ध उसापैकी २० टक्के ऊस संपलेला आहे. यामुळे यंदा साखर कारखानदारीसाठी हंगाम अडचणीचा ठरणार आहे.
जिल्ह्यात पारनेर आणि नगर वगळता १४ सहकारी व ६ खासगी असे २० साखर कारखाने आहेत. या कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात यंदा पावसाअभावी उसाची टंचाई जाणवणार आहे. प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्या कार्यालयाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात १ लाख २२ हजार हेक्टर उसाचे क्षेत्र गृहीत धरण्यात आलेले आहे. या क्षेत्रातून ७९ लाख ३० मेट्रीक टन गाळप होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे.
गेल्या वर्षी विभागात २० कारखान्यांनी केलेल्या गाळपात ९२ लाख ९२ हजार मेट्रीक टन ऊसाचे गाळप केले होते. त्यावेळी खरिपाच्या सुरूवातीला झालेल्या दमदार पावसामुळे चाऱ्याचा प्रश्न नव्हता, नवीन लागवड मोठ्या प्रमाणात झालेली होती. यंदा परिस्थिती विपरीत आहे. साधारण जानेवारी ते मार्च या काळात झालेली गारपीट आणि त्यानंतर निर्माण झालेली पाण्याच्या टंचाईचा फटाका उसाला बसला आहे. २५ जुलै अखेर जिल्ह्यात अवघा एक टक्का उसाची लागवड झालेली आहे.
जिल्ह्यात यंदाच्या हंगामासाठी ३७ हजार ९१७ हेक्टरवर आडसाली, ३३ हजार ४०५ पूर्वहंगामी, ४६ हजार ४६३ सुरू आणि ६० हजार २१४ खोडवा आहे. सर्व उसाचे गाळप झाल्यास त्यातून ७९ लाख ३० हजार मेट्रीक टन गाळप होईल, असा अंदाज प्रादेशिक सहसंचालक विभागाला आहे. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता जिल्ह्यात चाऱ्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात ५ लाख लहान तर १० लाख ६२ हजार मोठी जनावरे आहेत. या जनावरांना चाऱ्यासाठी उसाशिवाय अन्य कोणताच पर्याय शिल्लक नाही. यामुळे मोठ्या प्रमाणात उसाचा वापर चाऱ्यासाठी होत आहे. तर काही ठिकाणी पाण्याअभावी ऊस जळून जाण्यापेक्षा त्याचा चाऱ्यासाठी विक्री होताना दिसत आहे. बाजारात साधारण दोन हजारांपासून तीन हजार रुपये मेट्रीक टनाने उसाची विक्री होताना दिसत आहे. (प्रतिनिधी)
कारखानेनिहाय उसाचे क्षेत्र हेक्टरमध्ये
अगस्ती २ हजार ९१०, अशोक ६ हजार ९२०, डॉ. तनपुरे ५ हजार ५५०, डॉ. विखे ५ हजार ६५०, श्री ज्ञानेश्वर ११ हजार ४६०, श्री गणेश २ हजार ४२५, केदारेश्वर १ हजार २५, कर्मवीर शंकरराव काळे ४ हजार ४७०, कुकडी ५ हजार ९७२, मुळा १० हजार ३२५, संगमनेर ६ हजार २००, संजीवनी ५ हजार ५६५, श्रीगोंदा ११ हजार ४१४, श्री वृध्देश्वर ४ हजार ६५५, पारनेर ८००, नगर २००, गंगामाई ८ हजार ८८०, श्री अंबालिका ८ हजार ७९०, जय श्रीराम २८५, प्रसाद ३ हजार ७५५, साईकृपा २ हजार ५६४, साईकृपा हिरडगाव १२ हजार १३५.
पावसाळा लांबल्यास जिल्ह्यात असणाऱ्या उसाचा चाऱ्यासाठी वापर होणार आहे. सध्या उपलब्ध उसापैकी १५ ते २० टक्के चाऱ्यासाठी वापरला जात आहे. मात्र, महिनाभर पावसाळा लांबल्यास ही टक्केवारी वाढणार आहे. याचा थेट फटका गळीत हंगामावर होणार आहे. नवीन लागवडीचा फारसा परिणाम हंगामावर होणार नाही.
आगामी गळीत हंगामाच्या नियोजनासाठी उपलब्ध ऊस व उत्पादकता अंदाज करण्यासाठी पुणे येथे नुकतीच साखर आयुक्तांनी बैठक बोलावली होती. या बैठकीला कृषी विभाागाचे अधिकारी, साखर कारखान्यांचे मुख्य शेतकी अधिकारी उपस्थित होते. यावेळी हंगामाबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. यंदा पावसाअभावी ऊसाच्या क्षेत्रात बदल होणार नसला तरी त्याचा उत्पादकतेवर परिणाम होणार आहे.
- मिलिंद भालेराव,
सहसंचालक साखर

Web Title: Turning Season During Sugarcane Crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.