महिन्यातून पंधरा दिवस पाणी बंद
By Admin | Updated: June 2, 2016 23:06 IST2016-06-02T22:54:52+5:302016-06-02T23:06:36+5:30
अहमदनगर : कल्याण-विशाखापट्टणम् महामार्गाचे रुंदीकरण न झाल्याने वाहतुकीच्या कोंडीचा येथील नागरिकांना कायमचा त्रास आहे.

महिन्यातून पंधरा दिवस पाणी बंद
अहमदनगर : कल्याण-विशाखापट्टणम् महामार्गाचे रुंदीकरण न झाल्याने वाहतुकीच्या कोंडीचा येथील नागरिकांना कायमचा त्रास आहे. गटारी, खडबडीत रस्ते अशी भिंगारची अवस्था आहे. महिन्यातून पंधरा दिवस पाणीच येत नाही. त्यामुळे नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागते. स्वातंत्र्य मिळाले मात्र ड्रेनेजलाईन मिळाली नाही, अशी संतापजनक भावना नागरिकांनी व्यक्त केली.
‘लोकमत आपल्या दारी’ टीमने गुरुवारी सकाळी भिंगार मधील मारुती मंदिरासमोर ज्येष्ठ नागरिक आणि वाघस्कर गल्लीतील महिलांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी भिंगारच्या दुर्दशेबद्दलचे वास्तव लोकमत टीमला सांगितले.
कल्याण-विशाखापट्टणम् महामार्ग रुंदीकरणाबाबत अद्याप ठोस कार्यवाही होत नसल्याने भिंगारची कोंडी झाली आहे. अतिक्रमणांमुळे रस्ते अरुंद झाले आहेत. अतिक्रमणे काढण्याबाबत छावणी परिषदेकडून कारवाई होत नसून तेथील अधिकारी वर्ग निर्ढावला असल्याने नागरिकांची समस्या ऐकून घेण्याची तसदी घेतली जात नाही. छावणी परिषदेचे अधिकारी आणि सदस्यही समस्यांबाबत गंभीर नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. महिन्यातील फक्त पंधरा दिवस पाणी येते. हे पाणीही कमी दाबाने येते़ त्यामुळे नागरिकांना पाणीही मिळत नाही़ तसेच पंधरा मिनिटेच पाणी असते. त्यातही पहिले पाच मिनिटे नळाला दूषित (पिवळ््या रंगाचे) पाणी येते. या पाण्याला दुर्गंधी असते. घाण पाण्यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे. वाघस्कर गल्ली येथील सार्वजनिक विहीर बंद केली आहे. विहिरीचे पाणी लोकांना उपलब्ध करून दिले तर नागरिकांना पाणी उपलब्ध होईल. गटारीचा प्रश्न प्राधान्याने सोडवावा, अशी मागणी महिलांनी केली.
भिंगारचा चटई क्षेत्राचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. खासदार दिलीप गांधी यांनी केवळ आश्वासने दिली, मात्र त्याची पूर्तता केली नाही. रस्त्याचे रुंदीकरण व्हावे. अतिक्रमणे हटवून रस्त्यांचा श्वास मोकळा करावा. अद्याप चटई क्षेत्र मंजूर नसल्याने भिंगारमध्ये नव्या बांधकामाला परवानगी दिली जात नाही. पैसे दिले की सर्व अवैध कामे छावणी मंडळाचे अधिकारी करतात. त्यांच्यावर ट्रॅप लावायचे ठरवले तरी राज्यातील एसीबीचा ट्रॅप त्यांच्या कायद्यात बसत नाही. छावणी परिषदेच्या जाचक अटीमुळे लोक भिंगार सोडून जात आहेत. ६० टक्के लोकांची घरे त्यांच्या नावावर झाली नाहीत.
-मतीन सय्यद,भिंगार
गटारी, पुरेशे पाणी, रस्ते अशा मूलभूत समस्या सोडवाव्यात. नाले सफाई व्हावी. जुने शहर असल्याने त्यात सुधारणा व्हाव्यात.- शिवाजी कौसे