तलाव परिसरातील वीज पुरवठा बंद करा : तहसीलदारांची महावितरणला नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 18:40 IST2019-05-09T18:39:55+5:302019-05-09T18:40:42+5:30
कुकडीच्या पाण्यातून श्रीगोंदा तालुक्यातील तलावांमध्ये पाणी सोडण्यात आले. मात्र तलाव परिसरातील वीज पुरवठा सुरू असल्याने बेकायदा पाणी उपसा सुरू आहे.

तलाव परिसरातील वीज पुरवठा बंद करा : तहसीलदारांची महावितरणला नोटीस
श्रीगोंदा : कुकडीच्या पाण्यातून श्रीगोंदा तालुक्यातील तलावांमध्ये पाणी सोडण्यात आले. मात्र तलाव परिसरातील वीज पुरवठा सुरू असल्याने बेकायदा पाणी उपसा सुरू आहे. तलाव परिसरातील एक किमी अंतरापर्यंतचा वीज पुरवठा बंद करावा, अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस तहसीलदार महेंद्र महाजन यांनी महावितरणच्या उप अभियंत्यांना बजावली आहे.
नोटीसमध्ये म्हटले आहे की, कुकडीचे आवर्तन पिण्यासाठी सोडण्यात आले आहे. यामधून श्रीगोंदा तालुक्यातील लहान मोठ्या ७२ तलावात पाणी सोडण्याची कार्यवाही सुरू आहे. विसापूर, भावडी, मोहरवाडी, सीना, घोडेगाव, मडकेवाडी (पारगाव), देऊळगाव इतर काही तलाव पिण्याच्या पाण्याचे टॅँकर भरण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत.
पिण्याचा पाणी प्रश्न विचारात घेऊन तलावातील उपसा थांबविण्यासाठी भरारी पथक नेमले आहे. त्यांनीही तलाव परिसरातील विद्युत रोहित्रांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे आदेश दिले होते. मात्र आपण कोणतीही कारवाई केलेली दिसत नाही. त्यामुळे विद्युत रोहित्रांचा वीज पुरवठा खंडित करावा. तसा अहवाल श्रीगोंदा तहसील कार्यालयातील टंचाई शाखेस पाठवावा, असे आदेश तहसीलदारांनी दिले आहेत.