आयटीपार्क बंद पाडण्याचा प्रयत्न होतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:26 IST2021-09-04T04:26:20+5:302021-09-04T04:26:20+5:30
अहमदनगर : अनेक अडचणींवर मात करीत नागापूर औद्योगिक वसाहतीतील बंद पडलेला आयटीपार्क सुरू केला. त्यामुळे स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध ...

आयटीपार्क बंद पाडण्याचा प्रयत्न होतोय
अहमदनगर : अनेक अडचणींवर मात करीत नागापूर औद्योगिक वसाहतीतील बंद पडलेला आयटीपार्क सुरू केला. त्यामुळे स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होत असून, आयटीपार्क बंद पाडण्याचा प्रयत्न काही व्यक्ती करीत आहेत. अशा पद्धतीने भीतीचे वातावरण केल्यास नवीन कंपन्या येणार नाहीत, अशी खंत आमदार संग्राम जगताप यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
संग्राम जगताप म्हणाले, तत्कालीन उद्योगमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कै. पतंगराव कदम यांच्या कार्यकाळात आयटी पार्क उभारण्यात आला. गेल्या २० वर्षांपासून हा आयटीपार्क बंद होता. इमारतीच्या काचा फुटलेल्या होत्या. फर्शी तुटलेली होती. छत गळत होते. मोहोळ बसलेले होते. विजेची कुठलीही व्यवस्था नव्हती. सन २०१६ मध्ये आयटी पार्क सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अनेक अडचणी होत्या. त्यावर मात करीत आयटी पार्कचे छोटेसे रोपटे लावले. स्टार्टअप कंपन्यांमधून सुरुवात केली. परंतु, कोरोनाचे संकट आले. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत अनेक उद्योगधंदे बंद पडले. अनेकांचा रोजगार गेला. आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातील रोजगार गेले. अशा परिस्थितीत नगरच्या आयटीपार्कमध्ये युवक-युवती काम करीत आहेत. परंतु, आठ ते दहा जणांनी आयटीपार्कमध्ये जाऊन दहशत माजविली. त्यामुळे तिथे काम करणारे युवक, युवती भयभीत झाले आहेत. हा एकप्रकारे आयटीपार्क बंद पाडण्याचा प्रयत्न आहे. नगरची जनता सुज्ञ आहे. नगरकर काम करणाऱ्यांच्या पाठीमागे उभे राहतात. पूर्वीसारखे आरोप करून मते मिळविण्याचे दिवस आता राहिलेले नाहीत. आयटी पार्क हे राजकीय व्यासपीठ नाही. ज्यांना कोणाला आयटीपार्कमध्ये नवीन कंपन्या आणायच्या आहेत, त्यांनी त्या जरुर आणाव्यात. तरुणांना रोजागार उपलब्ध करून द्यावा. आयटी पार्कच्या इमारती शेजारचा भूखंडही आयटीसाठी राखीव आहे. तिथेही आयटी पार्क सुरू करणार असल्याचे जगताप म्हणाले. समाजामध्ये किंमत नसणारे लोक माझ्यावर आरोप करून प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे जगताप यांनी सांगितले. यावेळी गणेश भोसले, स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, शहराध्यक्ष माणिकराव विधाते, आदी उपस्थित होते.
.....
विनयभंगाचा खोटा गुन्हा - किरण काळे
नागापूर येथील आयटीपार्कची पाहणी करीत असताना कोणत्याही महिलेचा विनयभंग, शिवीगाळ, धक्काबुक्की, दमदाटी, असे कृत्य केलेले नाही. आयटीपार्कमध्ये कॉल सेंटर सुरू असून, या कॉल सेंटरमध्ये आम्ही जबरदस्तीने प्रवेश केलेला नाही. तेथे काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांची हरकत नसल्यामुळे आयटी पार्कमध्ये प्रवेश केला. जर त्यांना हरकत असती तर, त्यांनी केलेल्या सूचनांचेही पालन केले असते. मात्र, त्यांनी आमच्याशी योग्य पद्धतीने संवाद साधला. कोणत्याही प्रकारची बाचाबाची झालेली नाही, असे सांगून काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी आयटी पार्कच्या पाहणीचा व्हिडिओ पत्रकार परिषदेत सादर केला.