संत्री घेऊन जाणारा ट्रक उलटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:42 IST2021-02-05T06:42:10+5:302021-02-05T06:42:10+5:30
घारगाव (जि. अहमदनगर) : नाशिकहून पुण्याला संत्री घेऊन जाणारा ट्रक ब्रेक निकामी झाल्याने उलटला. हा अपघात मंगळवारी (दि. २) ...

संत्री घेऊन जाणारा ट्रक उलटला
घारगाव (जि. अहमदनगर) : नाशिकहून पुण्याला संत्री घेऊन जाणारा ट्रक ब्रेक निकामी झाल्याने उलटला. हा अपघात मंगळवारी (दि. २) सकाळी साडेअकराच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावर संगमेनर तालुक्यातील आळेखिंडीत घडला. या अपघातात ट्रकसह मालाचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने ट्रक चालक व क्लिनर हे दोघेही या अपघातातून बचावले.
आर. जे. २७, जी. सी. १६६४ या क्रमांकाच्या ट्रकमधून १६ टन संत्री भरून ती नाशिकहून पुण्याला नेण्यात येत होती. मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास हा ट्रक बोटा शिवारातील आळेखिंड येथील हनुमाननगर या ठिकाणी आला. यावेळी ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने तो महामार्गाच्या कडेला असलेल्या एका शेतात जाऊन उलटला. घटनेची माहिती पोलीस पाटील संजय जठार यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी याबाबत घारगाव पोलीस व महामार्ग पोलिसांना कळविले. डोळासणे येथील महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रमुख, सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र शिंदे हे अपघातस्थळी दाखल झाले. पोलीस हेड कॉन्स्टेबल कैलास देशमुख, गणेश लोंढे, अरविंद गिरी, योगीराज सोनवणे, एकनाथ लिंबोरे, मनेश शिंदे यांनी ट्रक काढण्यासाठी क्रेन बोलविली. ट्रकचालक व क्लिनरचे नाव समजू शकले नाही.