संगमनेर: नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील कासारा दुमाला गावच्या हद्दीत ट्रक आणि दुचाकीच्या झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी (१० मे) पहाटे दोन वाजेच्या सुमारास घडला. या अपघातात बाप-लेक जागीच ठार झाले.अशोक सोमनाथ वाघ व शकुंतला अशोक वाघ असे या अपघातात ठार झालेल्या बाप-लेकीचे नाव आहे. तर आशाबाई वाघ, दिलीप भाऊसाहेब मेंगाळ अशी गंभीर जखमींची नावे आहेत. हे सर्व अकोले तालुक्यातील कळस गावचे रहिवासी आहेत. संगमनेर तालुक्यातील कासारा दुमाला येथे यात्रेनिमित्त ते नातेवाईकांकडे गेले होते. यात्रेवरून पुन्हा कळस येथे जात असताना नाशिकहून पुण्याकडे सिमेंटचे ठोकळे घेवून जाणार ट्रक आणि हे चौघे प्रवास करीत असलेल्या दुचाकीचा अपघात झाला. यात दुचाकीवरील अशोक वाघ व शकुंतला वाघ हे दोघे जागीच ठार झाले. तर आशाबाई वाघ व दिलीप मेंगाळ हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शहरातील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
नाशिक-पुणे महामार्र्गावर ट्रक-दुचाकीचा अपघात : बाप-लेकीचा जागीच मृत्यू, दोघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 15:24 IST