नगर जिल्ह्यात आरटीई प्रवेशासाठी तिप्पट अर्ज
By चंद्रकांत शेळके | Updated: March 27, 2023 15:38 IST2023-03-27T15:36:59+5:302023-03-27T15:38:42+5:30
म्हणजे उपलब्ध जागेपेक्षा तिपटीहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे कोणाला प्रवेश मिळणार, याकडे लक्ष लागले आहे.

नगर जिल्ह्यात आरटीई प्रवेशासाठी तिप्पट अर्ज
चंद्रकांत शेळके, अहमदनगर : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) देण्यात येणाऱ्या मोफत प्रवेशासाठी अर्ज भरण्याच्या मुदतीत एकूण ९ हजार ८१८ अर्ज प्राप्त झाले असून पुढील आठवड्यात आता या अर्जांमधून लाॅटरी पद्धतीने प्रवेशासाठी नावे निश्चित केली जाणार आहेत. जिल्ह्यात पहिलीसाठी एकूण २८२५ जागांवर यंदा प्रवेश मिळणार आहेत. म्हणजे उपलब्ध जागेपेक्षा तिपटीहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे कोणाला प्रवेश मिळणार, याकडे लक्ष लागले आहे.
आरटीईअंतर्गत वंचित घटक आणि दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश मिळतो. वंचित घटकांत अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, विशेष मागास वर्ग, दिव्यांग, अनाथ, एचआयव्हीग्रस्त, तसेच कोविड प्रभावित बालकांचा समावेश होतो. वंचित घटकातील विद्यार्थ्यांना उत्पन्नाची कोणतीही अट नाही. केवळ जातीच्या दाखल्यावर प्रवेश अर्ज करता येतो. दुर्बल घटकासाठी मात्र तहसीलदारांचा एक लाखाच्या आतील उत्पन्नाचा दाखला लागेल.
यंदा अहमदनगर जिल्ह्यातील ३६४ शाळांमध्ये २८२५ जागा भरायच्या आहेत. प्रारंभी १ ते १७ मार्च या कालावधीत यासाठी ॲानलाईन अर्ज भरण्याची मुदत होती. परंतु नंतर पालकांच्या मागणीनुसार ही मुदत २५ मार्चपर्यंत वाढवण्यात आली. या मुदतीत जिल्ह्यात एकूण ९ हजार ८१८ अर्ज प्राप्त झाले आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"