आदिवासी बनवणार फणसांचे कुरकुरे; एका फणसाचे होणार पाचशे रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 13:08 IST2020-06-28T13:06:22+5:302020-06-28T13:08:25+5:30
अकोले तालुक्यात येणा-या पर्यटकांना तालुक्यातील पारंपरिक पदार्थाबरोबर आता फणसाचे पौष्टिक अन् खमंग चिप्स व कुरकुरे चाखायला मिळणार आहेत. यातून एका फणसापासून आदिवासींना ५०० रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे.

आदिवासी बनवणार फणसांचे कुरकुरे; एका फणसाचे होणार पाचशे रुपये
मच्छिंद्र देशमुख ।
कोतूळ : अकोले तालुक्यात येणा-या पर्यटकांना तालुक्यातील पारंपरिक पदार्थाबरोबर आता फणसाचे पौष्टिक अन् खमंग चिप्स व कुरकुरे चाखायला मिळणार आहेत. यातून एका फणसापासून आदिवासींना ५०० रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे.
अकोले तालुक्यातील वातावरण फणसासाठी अत्यंत पोषक आहे. अकोले तालुक्यात मुळा खो-यात कोहणे, कोथळे, विहीर तसेच भंडारदरा परिसरातील उडदावणे, पांजरे, कुमशेत जानायवाडी परिसरात फणसाची झाडे होती. त्याची रोपे आदिवासी बांधवांनी गेल्या दहा वर्षांपासून लावली आहेत. चार-पाच वर्षांपासून या भागात फणसाचे उत्पादन होऊ लागले. पक्व फणस केवळ ५० ते ६० रूपयांना विकले जाते़ गर काढून विकल्यास त्याचे शंभर ते दीडशे रुपये होतात.
अकोले तालुक्यातील आदिवासी भागात पर्यटनाचा आलेख वाढतो आहे. त्यामुळे या भागात पर्यटनावर आधारीत लघुउद्योगही वाढत आहेत. पर्यटकांना येथील स्थानिक रानमेव्याचा आस्वाद घेण्याबरोबर आता फणसाचे चिप्स व कुरकुरे चाखायला मिळणार आहेत.
मागील आठवड्यात पांजरे गावात तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, मंडल अधिकारी बी. बी. बांबळे यांनी चिप्स व कुरकुरे बनविण्याचे प्रशिक्षण आदिवासी बांधवांना दिले. तळलेले चिप्स व कुरकुरे दीर्घकाळ टिकून राहत असल्याने विक्रीस सुलभ आहेत.
प्रशिक्षणावेळी सखाराम गांगड, बच्चू गांगड, शांताराम गिर्हे, कृषी पर्यवेक्षक अशोक धुमाळ, भगवान वाकचौरे, शिवा राऊत, यशवंत खोकल, रावसाहेब वायळ, शरद लोहकरे, रोहिणी कडलग, मंगल ठोकळ, संजीवनी धिंदळे आदी उपस्थित होते.
अकोले तालुक्यातील वातावरण फणस पिकासाठी अत्यंत पोषक आहे. फणस पिकाची रानात, बांधावर, घरासमोर लागवड केली तर हमखास उत्पन्न मिळते. प्रक्रिया करून विविध पदार्थ बनवता येतात. चिप्स व कुरकुरे विक्रीतून फणसाचे आठ दहा किलोच्या फळाचे सहज पाचशे रुपये होतात.
-प्रवीण गोसावी, तालुका कृषी अधिकारी, अकोले.