आदिवासी मुलांना मिळणार स्नेह
By Admin | Updated: July 14, 2023 12:01 IST2014-05-13T00:55:38+5:302023-07-14T12:01:23+5:30
श्रीगोंदा : आदिवासी जमातीतील मुलांसाठी पुढारलेल्या समाजाचा स्नेह मिळणे ही दुरापास्त गोष्ट़ त्यातच पिढ्यान्पिढ्या गुन्हेगारांचा शिक्का माथी लागलेल्या पारधी समाजाच्या मुलांना थेट झिडकारले जाते़

आदिवासी मुलांना मिळणार स्नेह
श्रीगोंदा : नेहमीच उपेक्षित जीवन जगणार्या आदिवासी जमातीतील मुलांसाठी पुढारलेल्या समाजाचा स्नेह मिळणे ही दुरापास्त गोष्ट़ त्यातच पिढ्यान्पिढ्या गुन्हेगारांचा शिक्का माथी लागलेल्या पारधी समाजाच्या मुलांना थेट झिडकारले जाते़ मात्र, या पारधी मुलांना आता राजपत्रित अधिकारी, उद्योगपती, बडे नेते आणि कलावंतांचा मायेचा स्नेह मिळणार आहे़ श्रीगोंदा येथील महामानव बाबा आमटे वसतीगृहातील आदिवासी जमातीतील ३० चिमुकल्या मुला-मुलींना सहलीचा आनंद मिळावा, यासाठी अनेकांचे हात सरसावले आहेत़ या मुलांना १ ते ३ जून दरम्यान पुणे शहरातील ऐतिहासिक स्थळांचे दर्शन घडविले जाणार आहे. पुण्यात विविध ठिकाणी भेटी देणार असून, या सहलीदरम्यान राजपत्रित अधिकारी, उद्योगपती, बडे नेते कलावंतांच्या निवासस्थानी या मुलांना स्नेह मिळणार आहे़ उन्हाळ्याची सुटी लागली की पुढारलेल्या वर्गातील मुलं-मुली आपले नातेवाईकांकडे जातात अथवा मुलांसाठी फॅमिली टूरचे आयोजन केले जाते. यामध्ये मुले उन्हाळी सुट्टीचा आनंद लुटतात. मात्र, पिढ्यान्पिढ्या परागंदा जीवन जगणार्या गुन्हेगारीचा डाग पडणार्या पारधी जमातीतील मुला-मुलींना कसली सहल आणि कसला स्नेह! त्यामुळेच एस.एस.सी. पुणे बोर्डाचे विभागीय सचिव अनिल गुंजाळ यांनी श्रीगोंदा येथील महामानव बाबा आमटे वसतीगृहातील मुला-मुलींसाठी पुणे शहर दर्शन सहलीची अनोखी संकल्पना मांडली. आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांच्यासह विविध क्षेत्रात समाजीक जाणीवेतून काम करणार्या बड्या व्यक्तींनी दोन-दोन मुलांची आपल्या निवासस्थानी राहण्याची सोय केली आहे. ही बडी माणसं या मुलांना कौटुंबीक प्रेम, जिव्हाळा, ओलावा देणार आहेत. तीन दिवसाच्या सहलीत मुलांना शनिवारवाडा, राजीव गांधी उद्यान, विश्रामवाडा, सिंहगड, बंड गार्डन, लेझर शो आदी ठिकाणे तसेच सिटी प्राईड सिनेमागृहात चित्रपट दाखविण्यात येणार आहे. श्रीगोंद्यातील पारधी जमातीतील मुला-मुलींना पुणेकरांचा स्नेह, प्रेम मिळणार आहे. यामधून जीवनात उर्मी येणार आहे. पारध्याच्या पालातील अंधारमय जीवनाला स्नेहाचा प्रकाश मिळाला आणि या प्रकाशाची किरण दूरवर पोहचू लागली आहे. (प्रतिनिधी) भावना मानवतावादी श्रीगोंद्यात अनंत झेंडे आणि त्यांच्या सहकार्यांनी पारधी समाजातील मुलांच्या जीवनात आधार, संस्कार, शिक्षणाच्या माध्यमातून आयुष्य बदलण्याची मुहूर्तमेढ रोवली. मानवतेच्या भावनेतून पुणे दर्शन आणि दिग्गजांचा स्नेह ही संकल्पना मांडली आणि यासाठी पुणेकरांचे स्नेहाचे हात पुढे आले.