निंबळक (ता. नगर) ग्रामपंचायत निवडणुकीत प्रचारासाठी मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी उमेदवारांनी अर्ज दाखल करण्याच्या अगोदरपासून जोरदार तयारी सुरू केली. ग्रामविकास पॅनेलचे राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, माजी सरपंच विलास लामखडे, परिवर्तन पॅनेलचे पंचायत समिती सदस्य डॉ. दिलीप पवार , बी. डी. कोतकर, विखे समर्थक राजेंद्र कोतकर, प्रा. संजय जाजगे, जनशक्ती पॅनेलचे युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख नितीन कोतकर, सरपंच शरद लामखडे हे ग्रामपंचायतीवर एक हाती सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. निंबळक ग्रामपंचायत हद्दीमध्ये औद्योगिक क्षेत्रातील कारखाने असल्याने मोठ्या प्रमाणात कर जमा होतो. पैसा असूनही या गावाचा पाणी प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. मागील पंचवार्षिक निवडणुकीत सरपंचपदाचा मान मिळविलेले शरद लामखडे यांनी अविनाश कोतकर यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या तिसऱ्या पॅनेलला पंसती देत तिसऱ्या आघाडीकडून निवडणूक लढवित आहेत. आतापर्यंत या गावात दोनच लढती होत होत्या. आता मात्र तीन लढती पहावयास मिळणार आहेत. सेनेचे पंचायत समिती सदस्य डॉ. दिलीप पवार, शाखाप्रमुख बी. डी. कोतकर, राजेंद्र कोतकर, प्रा.संजय जाजगे यांनी पॅनेल तयार केला. जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे व विलास लाखडे याचा स्वंतत्र पॅनेल आहे. युवा सेनेचे नितीन कोतकर यांचा स्वंतत्र पॅनेल अशी तिरंगी लढत होत आहे. सेना व युवा सेना हे वेगवेगळे लढताना पहावयास मिळत आहे.
....
नातेवाईकांची कोंडी
ग्रामपंचायत निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांचे गावात एकमेकांशी नातेसंबध आहेत. यामुळे नातेवाईकांची चांगलीच पंचाईत होणार आहे. गावामध्ये असणारे मतदार कोणाच्या पारड्यात मतदान टाकतात? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.