आरोपीचा कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न
By Admin | Updated: December 19, 2015 23:50 IST2015-12-19T23:42:34+5:302015-12-19T23:50:24+5:30
अहमदनगर : आरडाओरड, शिवीगाळ करीत एका आरोपीने एमआयडीसी पोलीस ठाण्यातील कोठडीमध्ये गजावर डोके आपटून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

आरोपीचा कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न
अहमदनगर : आरडाओरड, शिवीगाळ करीत एका आरोपीने एमआयडीसी पोलीस ठाण्यातील कोठडीमध्ये गजावर डोके आपटून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली.
या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील विविध गुन्ह्यातील आरोपींना अटक केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशान्वये एमआयडीसी पोलीस ठाण्यातील कोठडीत (लॉकअप) ठेवले जाते. कोतवाली पोलिसांनी एका गुन्ह्यात अटक केलेला दत्तात्रय उर्फ बापू भिकोबा हारगुडे (वय ४३, रा. वाघोली, जि. पुणे) याला अन्य आरोपींसह कोठडीत बंद करण्यात आले होते. शुक्रवारी मध्यरात्री त्याने आरडाओरड करीत शिवीगाळ केली.
‘आता पोलिसांना कामालाच लावतो’, असे ओरडत त्याने कोठडीच्या गजावर डोके आपटले. यावेळी तेथे हजर असलेल्या पोलिसांनी तत्परतेने आरोपीला आवरले. मात्र, या प्रकारामुळे पोलिसांच्या चिंतेत भर पडली. या प्रकरणी पोलीस डायरीत आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची नोंद झाली आहे. अधिक तपास हेड कॉन्स्टेबल हसन शेख करीत आहेत. (प्रतिनिधी)