वृक्ष लागवडीला ब्रेक!
By Admin | Updated: July 23, 2014 00:18 IST2014-07-22T23:24:20+5:302014-07-23T00:18:37+5:30
अहमदनगर : पावसाने दडी मारल्याने पाण्याच्या प्रश्न गंभीर बनला आहे. या दुष्काळी परिस्थितीतून वन, सामाजिक वनीकरण आणि जिल्हा परिषदेचा रोजगार हमी विभागही वाचलेला नाही.
वृक्ष लागवडीला ब्रेक!
अहमदनगर : पावसाने दडी मारल्याने पाण्याच्या प्रश्न गंभीर बनला आहे. या दुष्काळी परिस्थितीतून वन, सामाजिक वनीकरण आणि जिल्हा परिषदेचा रोजगार हमी विभागही वाचलेला नाही. यंदा जिल्ह्यात शतकोटी वृक्ष लागवड योजनेत ४१ लाख ४० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असताना आतापर्यंत केवळ दोन लाख ५७ हजार लागवड झालेली आहे. दरम्यान, जिल्ह्यात दुर्मीळ होत चाललेल्या वृक्ष आणि अन्य औषधी वनस्पतींचे संवर्धनासाठी या वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात साधारण १ लाख ८२ हजार हेक्टर वन विभागाचे क्षेत्र आहे. नगर विभागात ८२ हजार २६६ हेक्टर आणि ४० हजार हेक्टर संगमनेर- अकोले विभागातील क्षेत्राचा समावेश आहे. पर्यावरणाचा समतोल राखला जावा, जास्तीत जास्त वृक्ष लागवड व्हावी यासाठी सरकार पातळीवरून विविध उपाय योजना सुरू आहेत. यात पर्यावरण समृध्द ग्राम, शतकोटीसारख्या योजनांचा समावेश आहे. पर्यावरण समृध्द गाव योजना जिल्हा परिषद तर शतकोटी योजना जिल्हा परिषद, सामाजिक वनीकरण, वन विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे.
जिल्हा परिषदेला यंदा ३० लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, त्यांनी पावसाअभावी ७ लाखांचे उद्दिष्ट घेतले. त्यासाठी ८ लाख ११ हजार खड्डे खोदून तयार आहेत. मात्र, अडचण आहे ती रोपांची. सलग दोन वर्षापासून पडलेला दुष्काळ, गेल्या वर्षी मध्यम स्वरूपाचा झालेला पाऊस यामुळे जिल्हा परिषदेच्या रोपवाटिकांची वाट लागलेली आहे. यामुळे जिल्हा परिषदेकडे रोपेच नाहीत. जिल्हा परिषदेला वनीकरण विभागाकडून ३ लाख रोपे आणि वन विभागाकडून एक लाख रोपे मिळणार असल्याचे सांगण्यात आले.
सामाजिक वनीकरण विभागाने २ लाख लागवड करण्याचे उद्दिष्ट घेतले असून १ लाख ३७ हजार खड्डे खोदून ठेवण्यात आलेले आहेत. आतापर्यंत सामाजिक वनीकरण विभागाने ३२ हजार रोपांची लागवड केलेली आहे. मागील वर्षी या विभागाने ३ लाख रोपांची लागवड केलेली होती. त्यापैकी सुमारे ९० टक्के रोपे जीवंत असल्याचा दावा सहाय्यक उपायुक्त अमृतकर यांनी केलेला आहे.
वन विभागाने यंदा ८६२ हेक्टरवर ९ लाख ४० हजार रोपे लावण्याचे उद्दिष्ट घेतलेले आहे. ही लागवड विभागाच्या हद्दीत खोदण्यात आलेल्या सलग समतोल चरात करण्यात आली आहे. आतापर्यंत ज्या-ज्या ठिकाणी पाऊस झालेला आहे त्या ठिकाणी सव्वा दोन लाख रोपांची लागवड करण्यात आल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली. दुर्मीळ होणाऱ्या वृक्षांचे जतन करण्यासाठी वन विभाग या वृक्षाची लागवड करणार आहे. पाऊस वेळेवर पडला असता, तर वृक्ष लागवडीचे आजचे चित्र वेगळे असते.
साग, चंदन, सिसम यासह अर्जुन, सादडा, धावडा या औषधी वनस्पती जिल्ह्यातून दुर्मिळ होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांच्या संवर्धनासाठी वन विभाग आणि अन्य यंत्रणांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. अन्यथा ही वृक्ष नामशेष होण्याची भीती व्यक्त होत आहे.
जिल्हा परिषदेने शतकोटी वृक्ष लागवड योजनेत २०१२-१३ ला २६ लाख रोपांची लागवड करण्यात आली होती. त्यातील ३० टक्के रोपे जिवंत, २०१३-१४ ला ३४ लाख रोपांची लागवड केली होती, त्यातील ४० टक्के रोपे जिवंत असल्याचे सांगण्यात आले. यंदा या योजनेत जिल्हा परिषद सुमारे चार लाख रोपे नाशिकच्या सामाजिक वनीकरण विभागाकडून घेणार आहेत.
विकासाचे भविष्य
वन विभागाने चार वर्षापूर्वी हिरडा, बेरडा, तेटू, पिठवण, साठवण, सालवण, अश्वगंधा या औषधी वनस्पतींचे रोपे तयार करून त्यांची लागवड करण्यास सुरूवात केलेली आहे.