केबलच्या वायरला हात लावला तुमचाही जीव जाऊ शकतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:25 IST2021-09-05T04:25:33+5:302021-09-05T04:25:33+5:30
अहमदनगर : टीव्हीच्या केबलला हात लावला तर तुमचाही जीव जाऊ शकतो. कारण तुमच्या घरात आलेल्या केबलच्या वायर वीजतारा, वीजखांब, ...

केबलच्या वायरला हात लावला तुमचाही जीव जाऊ शकतो
अहमदनगर : टीव्हीच्या केबलला हात लावला तर तुमचाही जीव जाऊ शकतो. कारण तुमच्या घरात आलेल्या केबलच्या वायर वीजतारा, वीजखांब, पथदिव्यांवरून तुमच्या घरात पोहोचल्या आहेत. रेल्वे स्टेशन भागातील नामांकित खेळाडू अजिंक्य गायकवाडने सदरची केबल टीव्हीला जोडताना शॉक लागला आणि जागेवरच त्याचा मृत्यू झाला. स्थानिक केबलच्या वायरमध्ये वीजप्रवाह उतरल्यानेच ही दुर्दैवी घटना घडल्याचे आता समोर आले आहे. महावितरण कंपनी, महापालिका यांच्या दुर्लक्षामुळे आणखी किती जणांचे जीव जाणार, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
नगर शहरातील रेल्वे स्टेशन भागात राहणारा गोळाफेक या क्रीडा प्रकारात आशियायी स्पर्धेत किताब मिळविणारा खेळाडू अजिंक्य गायकवाड (वय २८) याचा १ सप्टेंबरला सायंकाळी मृत्यू झाला. तो माजी नगरसेवक सुरेश गायकवाड यांचा मुलगा, तर हॉटेल व्यावसायिक दत्ता गायकवाड यांचा पुतण्या होता. गायकवाड यांचे साईनगर, विनायक नगर परिसरात घर आहे. राहत्या घरी विजेचा शॉक लागून अजिंक्यचा मृत्यू झाला. या घटनेनंतर जागरूक नागरिक मंचचे अध्यक्ष सुहास मुळे, मकरंद घोडके यांनी गायकवाड यांच्या घरी भेट दिल्यानंतर या मृत्यूच्या कारणाचा उलगडा झाला. गायकवाड यांच्या घरातील लोकल चॅनलची केबल टीव्हीला लावताना त्या केबललाच चिकटून अजिंक्यचा मृत्यू झाला. त्या केबलमध्ये ४४०० होल्ट इतका विजेचा उच्चदाब उतरला होता. ही केबल हाय टेन्शन लाइनवरून घरात आलेली होती. त्यामुळे त्या विद्युत तारांमधील वीज प्रवाह केबलमध्ये उतरला होता, असे तेथे केलेल्या पाहणीत आढळून आले. या परिसरातील बहुतांश सर्वच केबल वीजतारा, पथदिव्यांवरून घरात आलेल्या आहेत. त्यामुळे कोणाच्याही घरात अशी दुर्घटना घडू शकते. याबाबत लोकांमध्ये जागृती होऊन या बेकायदा पद्धतीने गेलेल्या केबल तत्काळ हटविण्याची मागणी मुळे यांनी केली आहे.
---------
केबलचे वितरण हे बेकायदा असून संपूर्ण नगर शहरामध्ये अशा प्रकारच्या केबल आहेत. वीजखांबावरून, पथदिव्यांचा आधार घेत या केबल घरोघरी गेलेल्या आहेत. याकडे महापालिका आणि महावितरण कंपनी यांचे साफ दुर्लक्ष होत आहे. या दुर्दैवी घटनेला महावितरण व महापालिका जबाबदार असल्याने आता त्यांच्याविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. दोन्ही यंत्रणांनी वीजतारांवरून तसेच पथदिव्यांवरून केबलचे जाळे तत्काळ हटवावे.
- सुहास मुळे, जागरूक नागरिक मंच, नगर
-------
फोटो- ०४ रेल्वे स्टेशन रोड
नगर शहरात पथदिवे, वीजखांब, वीजतारांवरून केबल घराघरात पोहोचले आहेत. त्याचेच रेल्वे स्टेशन भागातील हे एक दृश्य.