नवऱ्याची दारू सोडविण्याचे सांगत विवाहितेवर नदीपात्रात अत्याचार
By शेखर पानसरे | Updated: October 25, 2023 13:19 IST2023-10-25T13:19:22+5:302023-10-25T13:19:51+5:30
या प्रकरणी अत्याचार करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

नवऱ्याची दारू सोडविण्याचे सांगत विवाहितेवर नदीपात्रात अत्याचार
संगमनेर : तुझ्या नवऱ्याची दारू सोडायची असल्यास नदीपात्रात फेरी करावी लागेल, असे सांगत एकाने विवाहितेला नदीपात्रात घेऊन जात तिच्यावर अत्याचार करण्यात आले. हा प्रकार मंगळवारी (दि.२४) संध्याकाळी ७.३० वाजेच्या सुमारास तालुक्यातील खांडगाव शिवारातील प्रवरा नदीपात्रात घडला. या प्रकरणी अत्याचार करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
पप्पू आव्हाड (रा. खांडगाव, ता. संगमनेर) असे विवाहितेवर अत्याचार करणाऱ्याचे नाव आहे. तिने बुधवारी (दि.२५) संगमनेर शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ‘तुझ्या नवऱ्याची दारू सोडायची असल्यास नदीपात्रात फेरी करावी लागेल’, असे आव्हाड हा विवाहितेला म्हणाला. त्यानंतर विवाहिता त्याच्यासोबत खांडगाव शिवारातील प्रवरा नदीपात्रात गेली.
आव्हाड याने तिला नेसलेली साडी काढण्यास सांगितली, खाली निंबू, नारळ ठेवून त्याला फेरी मारण्यास सांगितले. विवाहिता फेरी मारत असतानाच त्याने तिच्यावर अत्याचार केले. असेही फिर्यादीत म्हटले आहे. संगमनेर शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब यादव अधिक तपास करीत आहेत.