काँग्रेसचा महापालिकेवर मशाल मोर्चा
By Admin | Updated: July 16, 2014 00:45 IST2014-07-15T23:34:11+5:302014-07-16T00:45:30+5:30
अहमदनगर: नगर शहरात महापालिकेच्यावतीने बसविण्यात येणाऱ्या पथदिव्याचे प्रलंबित असलेले काम तातडीने पूर्ण करावे यासाठी कॉँग्रेसच्यावतीने महापालिकेवर मशाल मोर्चा काढण्यात आला.
काँग्रेसचा महापालिकेवर मशाल मोर्चा
अहमदनगर: नगर शहरात महापालिकेच्यावतीने बसविण्यात येणाऱ्या पथदिव्याचे प्रलंबित असलेले काम तातडीने पूर्ण करावे यासाठी कॉँग्रेसच्यावतीने महापालिकेवर मशाल मोर्चा काढण्यात आला. तातडीने हे काम सुरू करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शहर जिल्हाध्यक्ष ब्रिजलाल सारडा यांनी यावेळी दिला.
नगरोत्थान योजनेंतर्गत नगर-मनमाड, नगर-औरंगाबाद, नगर-पुणे व नगर-नेप्ती रोडवर पथदिवे बसविण्याचे काम हाती घेण्यात आले. संबंधित ठेकेदार संस्थेने तिन्ही रस्त्यांची कामे पूर्णपणे केली नाहीत. एसपी चौक ते सनी पॅलेस हॉटेलपर्यंतचे काम सोडून देऊन ठेकेदार पसार झाला आहे. महापालिकेने ठेकेदाराला ठेका रद्द करण्याची नोटीस दिली. त्यानंतर ठेकेदाराने खांब उभारणीसाठी खड्डे खोदले. पण खांब मात्र उभे केले नाहीत. ठेका रद्द करण्याची नोटीस देऊन पंधरा दिवस उलटले तरी ठेकेदाराने नोटिसीला साधे उत्तरही दिले नाही. महापालिका प्रशासनाने ठेकेदारावर कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे कॉँग्रेस पक्षाच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले. महापालिका कार्यालयासमोर मशाल पेटवून प्रतीकात्मक उजेड करण्यात आला. शहर जिल्हा सरचिटणीस उबेद शेख, बाळासाहेब भुजबळ, दीपक धेंड, शामराव वाघस्कर, महिला शहर जिल्हाध्यक्ष सविता मोरे आदींसह कॉँग्रेस कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
प्रशासनाच्या विरोधात आंदोलन
महापालिकेत कॉँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. तरीही कॉँग्रेसने हे आंदोलन केले. याबाबत बोलताना सारडा म्हणाले, आमचे आंदोलन सत्ताधाऱ्यांच्या नाहीतर प्रशासनाच्या विरोधात आहे. ठेकेदाराकडून काम करून घेणे हे प्रशासनाचे काम आहे. प्रशासन मात्र काहीच करत नसेल तर आंदोलन केलेच पाहिजे असे सांगत सारडा यांनी आंदोलनामागील कारण स्पष्ट केले.