मेंहदी लावायच्या हातावर सॅनिटायझर चोळण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:25 IST2021-04-30T04:25:25+5:302021-04-30T04:25:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क लोणीः कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी लॉकडाऊन व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परिणामी राहाता ...

मेंहदी लावायच्या हातावर सॅनिटायझर चोळण्याची वेळ
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणीः कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी लॉकडाऊन व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परिणामी राहाता तालुक्यातील शेकडो वधू-वरपित्यांची चिंता वाढली आहे. अनेकांच्या निघालेल्या लग्नतारखा पुढे ढकलाव्या लागल्या, तर अनेकांनी आहे त्या स्थितीत १५ ते २५ जणांच्या साक्षीने विवाह उरकले. मात्र, त्यामुळे यंदा कर्तव्य असणाऱ्या जोडप्यांमध्ये धाकधूक वाढली असून, मेहंदी लावायच्या हातावर सॅनिटायझर चोळत बसण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
लग्नसराईचा खरा मौसम एप्रिल-मे या दोन महिन्यातच असतो. या दोन महिन्यात लग्नतारखा व विवाह मुहूर्त होते. अगोदरच सहा महिन्यांपासून वधू-वरपित्यांनी विवाहाची तारीख निश्चित करून मंगल कार्यालय बुक केले होते. लग्नसराईची लगबग व धावपळही बऱ्याच प्रमाणात सुरू होती. मात्र, मार्चअखेर व एप्रिल महिन्याच्या प्रारंभीपासूनच कोरोना संसर्गाबाबत जनजागृती वाढली. अचानकच कोरोनाचा प्रसार होऊ नये. यासाठी लॉकडाऊन व कडक निर्बंध लागू करण्यात आले. या लॉकडाऊनचा वाढता कालावधी वधू वर पित्यांसाठी चिंतेचा विषय ठरला. लॉकडाऊनमुळे व संचारबंदीमुळे मोठ्या प्रमाणात निर्बंध आले.
जिथे घराच्या बाहेर निघण्याची सोय नाही तिथे विवाह तर दूरच राहिले. विवाहाच्या निमित्ताने अनेकांनी पत्रिका, कपड्यांचे बस्ते व विविध प्रकारची तयारी केली होती. वधू-वरही आपापल्या परीने तयारी लागले होते. अशातच या लॉकडाऊनने त्यांच्या आनंदावर विरजण पडले. ज्या हातांवर मेहंदी लावायची, आता त्या हातावर सॅनिटायझर चोळण्याची वेळ आली आहे.
विवाह संस्था लॉकडाऊनमध्ये ठप्प राहिल्याने कपडा, सोने, सौंदर्यप्रसाधने, मंगल कार्यालय, बॅण्ड, केटरिंग, आचारी, बांगड्या, भांडी, फर्निचर यांच्यासह विविध दुकानेही बंद आहेत. त्यांनाही या लग्नसराईचा मोठा फटका कोरोनामुळे सहन करावा लागत आहे.
.
.......
विवाह मुहूर्तांची घाई करू नये
महामारीच्या संकटामुळे शासनाने लॉकडाऊनच्या माध्यमातून कडक निर्बंध घातले आहे. त्यातच विवाह समारंभासदेखील बंदी घातलेली आहे. तरीही अनेक वर व वधू पिता लपून छपून विवाह आयोजित करत आहेत. पुढील काही महिन्यात मुहूर्त नाहीत, असा चुकीचा समज करून विवाह समारंभ आयोजित केल्यामुळे रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. पुढील काळात अनेक मुहूर्त असून नागरिकांनी विवाह मुहूर्ताची घाई करू नये, असे राहता येथील ज्योतिषाचार्य अनंत शास्त्री लावर यांनी म्हटले आहे.
.........
नोंदणी विवाह करणे झाले अवघड....
कोरोनाच्या संकटामुळे गर्दी न करता मोजक्याच नातेवाइकांच्या उपस्थितीत विवाह आटोपता घ्यावा असा प्रयत्न असलेल्या अनेकांनी नाइलाजाने नोंदणी विवाहाचा मार्ग निवडला. पण, सध्या लॉकडाऊनमुळे हाही मार्ग अवघड होऊन बसला आहे.
.........
जुळलेले लग्न लॉकडाऊनमध्ये हाईना...
प्रत्येक समाजात मुलींची कमी असणारी संख्या आणि त्यांच्या वाढलेल्या अपेक्षा यामुळे मुलांची लग्न जमणे, हीच मोठी डोकेदुखी झाली आहे. अशाही स्थितीत वधू संशोधन झाले. लग्न जुळले अन् जुळलेले लग्न लॉकडाऊनमुळे होईना, अशी अनेकांची स्थिती झाली आहे.