तिढा सुटला.. २० मे पासून मिळणार कुकडीचे आवर्तन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:21 IST2021-05-18T04:21:10+5:302021-05-18T04:21:10+5:30
श्रीगोंदा : कुकडीच्या आवर्तनावर मुंबई उच्च न्यायालयात जुन्नरच्या प्रशांत औटी यांनी दाखल केलेली याचिका सोमवारी मागे घेतली. त्यामुळे ...

तिढा सुटला.. २० मे पासून मिळणार कुकडीचे आवर्तन
श्रीगोंदा : कुकडीच्या आवर्तनावर मुंबई उच्च न्यायालयात जुन्नरच्या प्रशांत औटी यांनी दाखल केलेली याचिका सोमवारी मागे घेतली. त्यामुळे कुकडीचे आवर्तन सुटण्याचा मार्ग मोकळा झाला असून येडगाव धरणातून २० मे पासून डाव्या कालव्याला आवर्तन सोडण्यात येणार आहे.
९ मे पासून कुकडीचे आवर्तन सोडण्यात येणार होते. त्यावर आठमाही पाण्याचा मुद्दा उपस्थित करून प्रशांत औटी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर उच्च न्यायालयाने ७ मे रोजी कुकडीचे आवर्तन सोडण्यावर स्थगिती दिली होती. पुढील सुनावणी १२ मे रोजी ठेवण्यात आली होती.
दरम्यान, माजी आमदार राहुल जगताप, घनश्याम शेलार, अण्णासाहेब शेलार, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, बाळासाहेब नाहाटा, राजेंद्र म्हस्के, अनुराधा नागवडे, विलास काकडे यांनी न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केल्या होत्या. ११ मे रोजी आमदार बबनराव पाचपुते, रोहित पवार, अतुल बेनके यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची मुंबईत भेट घेतली. प्रशांत औटी यांना याचिका मागे घेण्यास सांगावे अशी मागणी केली. त्यावेळी जयंत पाटील यांनी औटी यांच्याशी चर्चा केली होती. ते याचिका मागे घेणार असेच चित्र होते. परंतु, प्रशांत औटी यांनी याचिका मागे घेतली नाही. त्यामुळे सरकारी पक्षाला न्यायालयाकडे बाजू मांडण्यासाठी वेळ मागावा लागला. न्यायालयाने १७ मे रोजी पुन्हा सुनावणी ठेवली.
त्यानंतर आमदार रोहित पवार, माजी आमदार राहुल जगताप, घनश्याम शेलार, अण्णासाहेब शेलार यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची पुन्हा भेट घेतली. त्यानंतर प्रशांत औटी यांची पुन्हा मनधरणी केली. अखेर प्रशांत औटी यांनी याचिका मागे घेतली. त्यामुळे कुकडीचे आवर्तन सोडण्याचा मार्ग मोकळा झाला. जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार २० मे रोजी आवर्तन सोडण्यात येणार आहे.
---
आवर्तनात कायमच राजकारण..
कुकडीचे आवर्तन वेळेवर सुटावे, अशी पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा येथील शेतकऱ्यांची भावना असते. परंतु, स्वत:च्या राजकारणासाठी राजकीय नेते डाव, प्रति डाव टाकतात. यात श्रीगोंद्याचे नेते आघाडीवर असतात. नेत्यांच्या भूमिकेमुळे कुकडी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचा फायद्यापेक्षा तोटाच जास्त होत असल्याचे दिसते.
----
प्रशांत औटी यांनी याचिका मागे घेतली ही चांगली बाब आहे. मात्र कुकडीच्या पाण्यासाठी लढाई या पुढील काळातही सुरू ठेवावी लागणार आहे. आम्हाला कुणाच्या ताटातील भाकरी नको. मात्र डिंभे, माणिकडोह जोड बोगद्याचे काम करून आम्हाला हक्काचे पाणी मिळाले पाहिजे.
-मारुती भापकर,
सामाजिक कार्यकर्ते