ट्रक-कार अपघातात अहमदनगरचे तीन ठार
By Admin | Updated: July 17, 2014 00:33 IST2014-07-16T23:50:40+5:302014-07-17T00:33:10+5:30
कर्जत(जि. अहमदनगर) : पुणे-सोलापूर महामार्गावरील भिगवण जवळील डाळज शिवारात मालट्रक-कार अपघातात अहमदनगरचे तिघे जागीच ठार, तर चौघे जखमी झाले.
ट्रक-कार अपघातात अहमदनगरचे तीन ठार
कर्जत(जि. अहमदनगर) : पुणे-सोलापूर महामार्गावरील भिगवण जवळील डाळज शिवारात मालट्रक-कार अपघातात अहमदनगरचे तिघे जागीच ठार, तर चौघे जखमी झाले. ही घटना मंगळवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली. जखमींवर इंदापूर, बारामती येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अहमदनगरचे पवार कुटुंब मंगळवारी रात्री सोलापूरकडून अहमदनगरला येत होते. रात्री ११़३० च्या सुमारास सोलापूर-पुणे महामार्गावरील डाळज नं. २ शिवारात उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून कारने (क्र.एम. एच-१६-३९१५) जोराची धडक दिली. यामध्ये रामराव कृष्णराव पवार, आशालता रामराव पवार (रा. मिलन अपार्टमेंट, नवनाथनगर, अहमदनगर) हे पती-पत्नी आणि कारचालक मिलिंद भरत पवार (रा.समतानगर, अहमदनगर) जागीच ठार झाले. विलास कृष्णराव पवार, शारदा भरत पवार, वैशाली सुरेश पवार, सुरेश कृष्णराव पवार हे जखमी झाले आहेत. या अपघातासंदर्भात संतोष मच्छिंद्र जगताप यांनी भिगवन पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.
तिघांवर नगरमध्ये अंत्यसंस्कार
अपघातामध्ये मृत्यू झालेल्या तिघांचे इंदापूर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर त्यांचे मृतदेह सकाळी नगरमध्ये आणण्यात आले. सकाळी साडेदहा वाजता त्यांच्यावर नगरच्या अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पवार यांच्या निधनाने नगरच्या समतानगर भागात शोककळा पसरली. मयत रामराव पवार हे महात्मा फुले कृषी विद्यापीठातून रजिस्ट्रार या पदावरून निवृत्त झाले होते. तर आशालता या गृहिणी होत्या. मिलिंद पवार हे एका खासगी टॅ्रव्हल्सचे संचालक होते.