साडेतीन वर्षांत १ हजार २८५ अल्पवयीन मुलींना फूस लावून पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:21 IST2021-07-28T04:21:48+5:302021-07-28T04:21:48+5:30
अहमदनगर : प्रेम, लग्न अन् इतर भौतिक सुखाचे आमिष दाखवून तर कधी ब्लॅकमेल करून जिल्ह्यात मागील साडेतीन वर्षांत १ ...

साडेतीन वर्षांत १ हजार २८५ अल्पवयीन मुलींना फूस लावून पळविले
अहमदनगर : प्रेम, लग्न अन् इतर भौतिक सुखाचे आमिष दाखवून तर कधी ब्लॅकमेल करून जिल्ह्यात मागील साडेतीन वर्षांत १ हजार २८५ अल्पवयीन मुलींना घरातून पळवून नेण्यात आले. यातील तब्बल १ हजार १८६ मुलींना पोलिसांनी शोधून काढत पुन्हा पालकांच्या स्वाधीन केले आहे. पोलिसांच्यावतीने दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या ऑपरेशन मुस्कानअंतर्गत माेठ्या प्रमाणात अशा मुलींचा शोध घेण्यात आला.
गेल्या काही वर्षांत अल्पवयीन मुली घरातून निघून जाण्याचे प्रमाण वाढत आहे. विशेष म्हणजे कोरोना काळातही जिल्ह्यात तब्बल ५०० अल्पवयीन मुलींना फूस लावून पळविल्याची नोंद आहे. घरातून निघून गेलेली मुलगी अल्पवयीन असेल तर पोलीस ठाण्यात अपनयनाच्या गुन्ह्याची नोंद केली जाते. यात प्रेम प्रकरणातून प्रियकरासोबत पळून जाण्याचे माेठे प्रमाण आहे. प्रियकरासोबत पळून गेलेल्या अनेक मुली पोलिसांना दयनीय अवस्थेत मिळून आलेल्या आहेत. प्रियकराने वेगवेगळी आमिष दाखविल्यानंतर मुली सहज भुलतात आणि घराचा उंबरठा ओलांडतात.
--------------------------
सोशल मीडियातून मुले-मुली एकमेकांच्या संपर्कात
लॉकडाऊनची बंधने तोडून मागील दीड वर्षांत जिल्ह्यातील ५०० अल्पवयीन मुलींनी घरातून धूम ठोकली. यातील ४२७ मुलींना पोलिसांनी शोधून काढले आहेत. यातील ९५ टक्के मुली या प्रियकराच्या आमिषाला बळी पडून घरातून निघून गेल्याचे समोर आले आहे. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे ऑनलाइन क्लास सुरू झाले. यातून अल्पवयीन मुला-मुलींच्या हातात स्मार्ट फोन अन् त्यात नेट पॅक आला. साेशल मीडियाच्या माध्यमातून अल्पवयीन मुले-मुली एकमेकांच्या संपर्कात आले. यातून मैत्री, प्रेम आणि थेट घरातून निघून जाणे, अशा स्वरूपाच्या सर्वाधिक घटना समोर आल्या आहेत.
---------------------------
मुला-मुलींचे चुकीचे पाऊल पडू नये म्हणून व्हा त्यांचे मित्र!
मुला-मुलींचे उमलते वय हा शारीरिक आणि मानसिक बदलाचा काळात असतो. अशा परिस्थित माता-पित्यांनी त्यांना समजून घेणे गरजेचे असते. मुले काय करतात, कुणाशी बोलतात, मोबाइलवर ते काय पाहतात याकडे लक्ष्य ठेवणे महत्त्वाचे ठरते. तसेच माता-पित्यांनी मित्र म्हणून मुलांशी संवाद साधला तर त्यांच्या मनातील भावभावना समजतात. यातून मुलांच्या बंडखोर प्रवृत्तीला आळा बसू शकतो, असे मानसोपचार तज्ज्ञांचे मत आहे.
----------------------
बेपत्ता व मिळालेल्या मुली
२०१८ बेपत्ता- ३८० - मिळाल्या- ३७६
२०१९ बेपत्ता- ४०५ - मिळाल्या- ३८३
२०२० बेपत्ता- ३५५ - मिळाल्या-३१६
२०२१ (मे पर्यंत) बेपत्ता- १४५ - मिळाल्या- १११