कोतवाली ठाण्यात शिवसेनेचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 19:45 IST2017-10-04T19:44:08+5:302017-10-04T19:45:52+5:30
अहमदनगर : महावितरण कार्यालयात निवेदन देण्यासाठी गेलेल्या शिवसेना पदाधिका-यांना पोलिसांनी जबरदस्तीने पोलीस ठाण्यात आणल्याने संतापलेल्या कार्यकर्त्यांनी कोतवाली ठाण्यात ठिय्या ...

कोतवाली ठाण्यात शिवसेनेचा ठिय्या
अहमदनगर : महावितरण कार्यालयात निवेदन देण्यासाठी गेलेल्या शिवसेना पदाधिका-यांना पोलिसांनी जबरदस्तीने पोलीस ठाण्यात आणल्याने संतापलेल्या कार्यकर्त्यांनी कोतवाली ठाण्यात ठिय्या देत आंदोलन केले़ सायंकाळी अपर पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील यांनी पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत दिलगिरी व्यक्त करत माफी मागितल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले़
माजी आमदार अनिल राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते भारनियमनाविरोधात येथील महावितरण कार्यालयात अधिका-यांना निवेदन देण्यासाठी गेले होते़ याचवेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही महावितरण कार्यालयाबाहेर भारनियमनाविरोधात आंदोलन करत होते़ दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमनेसामने आले तर घोषणाबाजी होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून कोतवाली पोलिसांनी राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनाही जबरदस्तीने पोलीस वाहनात बसवून कोतवाली ठाण्यात आणले़ ठाण्यात आल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते निघून गेले़ शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी मात्र ठाण्यासमोर ठिय्या देत आम्हाला जबरदस्तीने पोलीस ठाण्यात आणणा-या अधिकारी व पोलीस कर्मचा-यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली़ राठोड यांच्यासह सेनेचे दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रा़ शशिकांत गाडे, शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते, संभाजी कदम, गणेश कवडे व कार्यकर्त्यांनी दोन ते अडीच तास ठिय्या दिला़ सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास अप्पर पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील यांनी ठाण्यात येऊन सेना पदाधिका-यांची माफी मागितल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले़ दरम्यान महावितरण कार्यालयात आंदोलन करणा-यांविरोधात फिर्याद दाखल करण्यासाठी महावितरणचे अधिकारी आले होते़ मात्र याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कुणाविरोधातही अधिका-यांनी फिर्याद दिली नव्हती़