ज्यांना घराजवळचा रस्ता करता आला नाही ते उड्डाणपुलाच्या गप्पा मारतात : आ. संग्राम जगताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 17:11 IST2018-11-29T17:10:58+5:302018-11-29T17:11:13+5:30
महापौर असताना कोठी ते यश पॅलेस रस्त्याच्या कामास कोट्यवधी रुपयांचा सर्वात सुंदर हा रस्ता पूर्ण केला. तसेच आनंदधाम ते स्वस्तिक चौक हा रस्ताही दर्जेदार करून मॉडेल रस्ता केला आहे.

ज्यांना घराजवळचा रस्ता करता आला नाही ते उड्डाणपुलाच्या गप्पा मारतात : आ. संग्राम जगताप
अहमदनगर : महापौर असताना कोठी ते यश पॅलेस रस्त्याच्या कामास कोट्यवधी रुपयांचा सर्वात सुंदर हा रस्ता पूर्ण केला. तसेच आनंदधाम ते स्वस्तिक चौक हा रस्ताही दर्जेदार करून मॉडेल रस्ता केला आहे. मात्र याच रस्त्यावर राहणा-या लोकप्रतिनिधीला शहरामध्ये असे एकही मोठे काम करता आले नाही. ज्यांना आपल्या घराजवळचा रस्ता करता आला नाही ते काय उड्डाणपूल करतील ? अशी तोफ राष्ट्रवादीचे आमदार जगताप यांनी भाजपाचे खासदार दिलीप गांधी यांच्यावर डागली. महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग १४ मध्ये जगताप बोलत होते.
जगताप म्हणाले, राज्यात असलेल्या सत्तेचा गैरवापर करत आम्हाला अडचणीत आणून खोट्या प्रकरणात आत टाकून औरंगाबादला ठेवले. प्रशासनावर मंत्र्यांचा दबाव आणून आमच्यावर कारवाई करण्यास भाग पाडले. मात्र मी डगमगलो नाही, प्रसंगाला सामोरे गेलो. अशा गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. जर अशा विचारांची येणा-या दिवसात वाढ झाली तर त्याचे परिणाम आम्ही भोगली आहेत. उद्या तुमच्यावरही अशी वेळ येऊ शकते. पण तुम्ही काळजी करू नका तुमच्या पाठीशी आमची ताकद आहे. म्हणून भावनांवर आता निवडणूक लढवण्याचे दिवस गेले आहेत, विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही पुढे जात आहोत, असेही जगताप म्हणाले.
यावेळी उमेदवार प्रकाश भागानागरे, शीतल जगताप, मीना चोपडा, संजय चोपडा, राष्ट्रावादीचे शहराध्यक्ष माणिक विधाते, कांतीलाल गुगळे, डॉ.विजय भंडारी, बबनराव घुले, प्रा.पोपटराव काळे, अर्जुन बोरुडे, विठ्ठल गुंजाळ, अलका मुंदडा, दिनेश जोशी, सुमतिलाल कोठारी, बापूसाहेब कुलट, ज्ञानदेव पांडूळे यांनीही आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश कराळे यांनी केले.