नगर शहरात डेंग्यूचे तीस संशयित रूग्ण
By Admin | Updated: September 4, 2015 00:13 IST2015-09-04T00:12:31+5:302015-09-04T00:13:53+5:30
अहमदनगर: नगर शहरात डेंग्यूची लागण झालेले दहा रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून डेंग्यूचे आणखी तीस संशयित रुग्ण आढळून आले आहेत.

नगर शहरात डेंग्यूचे तीस संशयित रूग्ण
अहमदनगर: नगर शहरात डेंग्यूची लागण झालेले दहा रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून डेंग्यूचे आणखी तीस संशयित रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी जिल्हा प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. महापालिकेच्या सर्वेक्षणात १७ घरातील पाणी साठे दूषित आढळून आले आहेत.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने आॅगस्ट महिन्यातील पहिल्या तीन आठवड्यात २८ हजार ८०० घरांचे सर्वेक्षण केले. त्यात साडेतीन हजार घरातील पाण्याचे साठे तपासण्यात आले. या तपासणीत १३९ घरातील पाणी साठे दूषित आढळून आले. आॅगस्टच्या पहिल्या तीन आठवड्यात नगर शहरात ६४ डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळून आले. त्यांचे रक्त नमुने जिल्हा प्रयोगशाळेत पाठविले असता त्यातील दहा जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले. खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर डेंग्यूचे हे रुग्ण बरे झाले आहेत. त्यानंतर म्हणजे आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात महापालिकेने ११ हजार ४०० घरांचे सर्वेक्षण केले. त्यात १ हजार १११८ घरांतील पाणी साठे तपासण्यात आले. त्यातील १७ घरांतील पाणी साठे दूषित असल्याचे समोर आले. या तपासणीत नगर शहरात डेंग्यूचे तीस संशयित रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी जिल्हा प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. या तपासणीचा अहवाल महापालिकेला अद्याप प्राप्त झालेला नाही.
डेंग्यूचे समूळ उच्चाटन करणे अशक्य असून कोरडा दिवस पाळून डासांची उत्पत्ती रोखता येणे शक्य आहे. नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा तसेच सार्वजनिक, निरूपयोगी वस्तीत पाणी साठे होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. महापालिकेमार्फत धूर फवारणी व डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनांची जागृती केली जात आहे. (प्रतिनिधी)