तीस मंत्र्यांना जेलची हवा
By Admin | Updated: July 7, 2014 00:35 IST2014-07-06T23:38:19+5:302014-07-07T00:35:38+5:30
अहमदनगर : राज्यात शिवसेना-भाजपाची युती अभेद्य राहणार असून, ज्या मतदारसंघात युतीचा उमेदवार कधीच निवडून आला नाही त्या जागेत अदला-बदल होणार
तीस मंत्र्यांना जेलची हवा
अहमदनगर : राज्यात शिवसेना-भाजपाची युती अभेद्य राहणार असून, ज्या मतदारसंघात युतीचा उमेदवार कधीच निवडून आला नाही त्या जागेत अदला-बदल होणार असल्याचे सांगून श्रीगोंदा मतदारसंघ शिवसेनेकडे येण्याचे संकेत राज्याचे माजी विरोधी पक्षनेते व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी दिले. तसेच युतीची सत्ता आल्यास विद्यमान ४० पैकी ३० मंत्र्यांना जेलची हवा खायला लावणार असा इशारा कदम यांनी दिला.
आगामी विधानसभा निवडणूक मार्गदर्शन मेळाव्याचे सारोळाबद्दी (ता.नगर) येथे आयोजन करण्यात आले यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी शिवसेना संपर्क प्रमुख सुहास सामंत, शिवसेना जिल्हा प्रमुख प्रा.शशिकांत गाडे, उपजिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी, अनिल कराळे, पं.स. सदस्य संदेश कार्ले, जि.प. सदस्य दत्तात्रय सदाफुले, पोपट निमसे, विश्वास जाधव, शंकर ढगे, सुजाता कदम, योगीराज गाडे, घन:श्याम म्हस्के, रावसाहेब म्हस्के उपस्थित होते. यावेळी कदम म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी महाराष्ट्र विकायला काढला पण आता विधानसभेवर भगवाच फडकणार. आपल्याकडे गृह खाते घेणार. ज्या मंत्र्यांनी महाराष्ट्रात करोडो रुपयांचा घोटाळा केला अशा ४० पैकी ३० मंत्र्यांना जेलची हवा खाण्यास पाठविणार. पहिला अजित पवार यांचा सिंचन घोटाळा बाहेर काढणार. नंतर नारायण राणे, छगन भुजबळ यांच्यापासून सुरुवात करणार. ज्या मंत्र्यांनी साखर कारखान्यामधून शेतकऱ्यांची लूटमार केली त्यांचा सुद्धा बेत पाहणार. शिवसेनेबरोबर ज्यांनी गद्दारी केली त्या सर्वांना लोकसभेत पराभूत होण्याची वेळ आली आहे. प्रत्येक विधानसभेमध्ये पन्नास हजार मतदारांची नाव नोंदणी करा. प्रत्येक गावात, घरात, गाव तेथे शिवसेना शाखा उभारा असे यावेळी ते म्हणाले.
यावेळी सामंत म्हणाले, राष्ट्रवादी पैशाच्या जोरावर उड्या मारत आहे. पण आता लोकसभेत त्यांच्या पैशाचे पानीपत झाले. तर विधानसभेमध्ये यांची मस्ती उतरवणार आहे. श्रीगोंदा मतदारसंघ हा शिवसेनेलाच घेणार असल्याचे सांगून या मतदारसंघात जास्तीत जास्त मतदारांची नाव नोंदणी करा. ग्रामीण भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. श्रीगोंदा मतदारसंघ शिवसेनेला दिला तर उमेदवार विजयीच करून दाखवू असे यावेळी सामंत म्हणाले. यावेळी टाकळी काझी, सारोळाबद्दी, भातोडी, निंबोडी येथे शाखेचे उद्घाटन करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)
मतदारच पांडुरंग
बबनराव पाचपुते यांनी दुष्काळी परिस्थितीत पंढरीची वारी करण्यापेक्षा मतदारसंघाची वारी केली तर तुम्हाला त्यांच्यातच पांडुरंग दिसेल असा टोला कदम यांनी पाचपुतेंवर मारला.