जिल्ह्यातील साडेसातशे अंगणवाड्या तहानलेल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 14:37 IST2018-05-17T14:35:38+5:302018-05-17T14:37:50+5:30
शिक्षणावर सर्वाधिक खर्च केल्याचा दावा ग्रामपंचायतींकडून केला जातो़ प्र्रत्यक्षात मात्र गावातील अंगणवाडीतील चिमुकल्यांना साधे पिण्याचे पाणीदेखील उपलब्ध करून दिले जात नाही़ जिल्ह्यातील साडेसातशेहून अधिक अंगणवाड्यात पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याचे महिला व बालकल्याण विभागाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे़

जिल्ह्यातील साडेसातशे अंगणवाड्या तहानलेल्या
अहमदनगर : शिक्षणावर सर्वाधिक खर्च केल्याचा दावा ग्रामपंचायतींकडून केला जातो़ प्र्रत्यक्षात मात्र गावातील अंगणवाडीतील चिमुकल्यांना साधे पिण्याचे पाणीदेखील उपलब्ध करून दिले जात नाही़ जिल्ह्यातील साडेसातशेहून अधिक अंगणवाड्यात पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याचे महिला व बालकल्याण विभागाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे़
उन्हाळा सुरू असल्याने शाळांना सध्या सुट्या आहेत़ मात्र, अंगणवाड्या सुरू आहेत़ सकाळी ८ ते दुपारी १, यावेळेत अंगणवाड्यात भरतात़ जिल्ह्यातील अंगणवाड्यांची संख्या ४ हजार ८०१ इतकी आहे़ उन्हाळा असल्याने अंगणवाड्यांमध्येच पिण्याच्या पाण्याची सुविधा असणे गरजेचे आहे़ मात्र जिल्ह्यातील ७६९ अंगणवाड्यांमध्ये कायमस्वरुपी पिण्याच्या पाण्याची सोय नाही़ राहुरी तालुक्यातील सर्वाधिक १७७ अंगणवाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही़ गावातील ग्रामपंचायतींना १४ व्या वित्त आयोगाचा निधी मिळतो़ या निधीतून गावात पायाभूत सुविधा पुरविल्या जातात़ मात्र गावातील शाळा व अंगणवाड्यांकडे दुर्लक्ष करण्यात येते़
गावातील शाळांना स्वतंत्र नळजोड आहेत़ अंगणवाडीला मात्र अशी कुठलीही सुविधा नाही़ त्यात अंगणवाड्या उन्हाळ्यात सुरू असतात़ असे असतानाही पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने चिमुकल्यांची गैरसोय होत आहे़
अंगणवाड्यांना जलशुध्दीकरण यंत्रांचाही पुरवठा करण्यात आला आहे़ मात्र काही ठिकाणी अंगणवाड्यांना सुविधा मिळत नसल्याने चिमुकल्यांची मोठी गैरसोय होत आहे़
शंभर टक्के पाणीपुरवठा
संगमनेर, शेवगाव, नगर, पारनेर, बेलवंडी आणि राहाता प्रकल्पातील सर्व अंगणवाड्यांमध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे़
पिण्याच्या पाण्याची सोय नसलेल्या अंगणवाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे़ कायमस्वरुपी सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. - मनोज ससे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग
सर्वाधिक संख्या राहुरीत
राहुरी प्रकल्पात सर्वाधिक १७७ अंगणवाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नाही़ त्याखालोखाल
वडाळा............... (१४४)
कर्जत ............... (८४)
जामखेड ............... (८२)
भिंगार ............... (६२)
श्रीरामपूर............... (५७)
कोपरगाव ............... (४७)
नेवासा ............... (३२)
राजूर ............... (३०)
अकोले ............... (२७)
पाथर्डी ............... (२१)
श्रीगोंदा............... (२०)
घारगाव ............... (१६)
येथील अंगणवाड्यांमध्ये पिण्याचे पाणी नाही़