पासष्टवर्षीय आजीने केला चोरट्यांना प्रतिकार
By Admin | Updated: January 15, 2016 23:29 IST2016-01-15T23:27:26+5:302016-01-15T23:29:20+5:30
आश्वी : वरवंडी (ता. संगमनेर) येथे चोरट्यांनी धुमाकूळ घालून साडेसहा तोळे सोन्यासह ५८ हजार रुपये घेऊन पोबारा केला. यात महिला मारहाणीत जखमी झाली आहे.

पासष्टवर्षीय आजीने केला चोरट्यांना प्रतिकार
आश्वी : वरवंडी (ता. संगमनेर) येथे चोरट्यांनी धुमाकूळ घालून साडेसहा तोळे सोन्यासह ५८ हजार रुपये घेऊन पोबारा केला. यात महिला मारहाणीत जखमी झाली आहे.
गुरुवारी मध्यरात्री १ वाजता सुमारास रंगनाथ दादा गागरे यांच्या घराच्या पाठीमागील खिडकीचे गज तोडून दरवाजाची कडी उघडून घरात प्रवेश करत घरातील लोखंडी पेटी शेतात नेऊन त्यात असलेले रोख ४६ हजार रुपये काढून घेतले. शेजारील खोलीत झोपलेल्या इंदुबाई गागरे (वय ६५) हिच्या गळ्यातील दीड तोळ्याची पोत काढत सुनबाई कुठे आहे, याची विचारणा केली. यावेळी इंदुबाईने चोरट्यांना मिठी मारत आरडाओरड सुरू करताच तिच्या हातावर पहारीचा घाव घालत तिचा गळा स्वेटरने आवळण्याचा प्रयत्न केला. मात्र, घरातील इतर लोक जागे झाल्याने तेथून पळ काढत आपला मोर्चा मारूती जिजाबा गारगे यांच्या वस्तीवर वळविला. घराचे काम सुरू असल्याने घरातील छोट्या खोलीत झोपलेल्या लोकांना ओलांडून कपाटातील रोख रक्कम बारा हजार रुपये व पाच तोळे सोने घेऊन पलायन केले. चोरट्यांची चाहूल लागताच मारूती गागरे यांनी त्यांचा पाठलाग केला. मात्र काही अंतरावर पाच ते सहा हत्यारबंद टोळके दिसल्याने ते आरडाओरड करत मागे वळाले. गावात सुरू असलेल्या जागरण गोंधळाचा कार्यक्रमामुळे आरडाओरड कोणाच्याही कानावर जात नसल्याने त्यांनी भ्रमणदूरध्वनीद्वारे सुभाष वर्पे यांना कल्पना दिली असता, त्यांनी गावातील तरुणांच्या साह्याने पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र यात यश आले नाही. १७ ते १९ वयोगटातील या तरुणांच्या हातात लोखंडी गज, काठ्या अशी हत्यारे होती.
उपसरपंच सुभाष वर्पे यांनी आश्वी पोलीस स्टेशनला याबाबत माहिती दिल्यानंतरही शुक्रवारी दुपारपर्यंत पोलीस घटनास्थळी पोहोचले नव्हते. या घटनेने पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत शंका निर्माण होत असून, ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. माहिती मिळताच संगमनेर दूध संघाचे अध्यक्ष रणजीत देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. ( प्रतिनिधी)