कोपरगावात चोरट्यांनी सराफाचे दुकान फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 13:33 IST2019-08-04T13:32:18+5:302019-08-04T13:33:19+5:30
शहरातील बाजारतळ परिसरातील सराफाच्या दुकानाचे अज्ञात चोरट्यांनी शटर तोडून दुकानातील सोन्या, चांदीचे दागिने व रोख रकमेसह ८ लाख १२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली.

कोपरगावात चोरट्यांनी सराफाचे दुकान फोडले
कोपरगाव : शहरातील बाजारतळ परिसरातील सराफाच्या दुकानाचे अज्ञात चोरट्यांनी शटर तोडून दुकानातील सोन्या, चांदीचे दागिने व रोख रकमेसह ८ लाख १२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. सराफाच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध शनिवारी सायंकाळी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.
पोलीस सूत्रांची माहिती अशी की, कोपरगाव शहरातील बाजारतळ परिसरातील अरविंद शामराव मंडलीक (रा.पवार सरकार वाडा, कोपरगाव) यांच्या मालकीचे ओंकार ज्वेलर्सचे शुक्रवारी रात्री २ ते ३ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शटरचे कुलूप तोडले. दुकानातील कपाटातील व तिजोरीमधील ६ लाख ७५ हजार रुपये किमतीचे २७० ग्रम सोन्याचे दागिने, ५२ हजार ५०० रुपये किमतीचे दुरुस्तीसाठी आलेले सोन्याचे दागिने ७५ हजार रुपये किमतीची २.५ किलो चांदी तर १० हजार रुपये रोख असा एकूण ८ लाख १२ हजार ५०० मुद्देमाल चोरीस गेला आहे. दुकानचे मालक अरविंद मंडलिक यांनी शनिवारी कोपरगाव शहर पोलिसात फिर्याद दिली.शिर्डीचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे, कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राकेश मानगावकर यांनी घटनास्थळी भेट देऊन तत्काळ नगर येथील श्वानपथक व फिंगर प्रिट पथक घटनास्थळी पाचारण केले. श्वान पथकाने बसस्थानक रस्त्याच्यामार्गे बागुल टॉवरपर्यंतच माग काढला.
याप्रकरणी मंडलिक यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहे. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ कोपरगाव शहरातील सराफा व्यापाऱ्यांनी शनिवारी दिवसभर बंद पाळला.