‘त्यांना’ पुन्हा सेनेत थारा नाही
By Admin | Updated: July 25, 2016 00:06 IST2016-07-24T23:51:52+5:302016-07-25T00:06:09+5:30
जामखेड : जामखेड नगरपरिषद निवडणुकीनंतर ज्यांनी सेनेच्या पाठीत खंजीर खुपसला अशांना पुन्हा शिवसेनेत थारा नाही.

‘त्यांना’ पुन्हा सेनेत थारा नाही
जामखेड : जामखेड नगरपरिषद निवडणुकीनंतर ज्यांनी सेनेच्या पाठीत खंजीर खुपसला अशांना पुन्हा शिवसेनेत थारा नाही. जर त्यांना शिवसैनिक म्हणून रहायचे असेल तर समस्त शिवसैनिकांची माफी मागून स्थानिक सत्तेतून बाहेर पडावे, असा सल्लाही शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांनी दिला.
जामखेड येथे आयोजित मेळाव्यात नगर महापालिकेच्या महापौर सुरेखा कदम यांचा कोरगावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़ यावेळी शिवसेना नेते रमेश खाडे, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, कर्जत -जामखेड संपर्कप्रमुख डॉ. विजय पाटील, जिल्हा उपप्रमुख राजेंद्र दळवी, नगरशहर प्रमुख संभाजी कदम, जि. प. सदस्य शहाजी राळेभात, तालुकाप्रमुख संभाजी राळेभात, उपप्रमुख मोहन जाधव, शहरप्रमुख संजय काशीद, अविनाश बेलेकर, जयसिंग डोके, तालुका संघटक हिंदूराज मुळे आदी उपस्थित होते. प्रारंभी महापौर सुरेखा कदम व सेना पदाधिकारी यांची शहरातून मिरवणूक काढून शक्तिप्रदर्शन करण्यात आले़
शिवसेना नेते रमेश खाडे म्हणाले, जामखेडमध्ये सुरुवातीला आम्ही शिवसेनेचे रोपटे लावले़ आता त्याचा वटवृक्ष झाला आहे. काही नाराज आहेत, त्यांना बरोबर घेऊन जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक जिंकायची आहे. तालुक्यातील शिवसैनिकांच्या पाठिशी मी खंबीरपणे उभे राहून त्यांच्या मदतीसाठी तयार असल्याचे खाडे म्हणाले.
जि. प. सदस्य शहाजी राळेभात म्हणाले, सेनेचे जुने नेतृत्व शिवसैनिकांपर्यंत पोहचत नव्हते म्हणून सेनेची वाढ तालुक्यात झाली नाही. आता आम्ही गावागावात, वाड्यावस्त्यावर शिवसेनेच्या शाखा उघडण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे़
महापौर कदम म्हणाल्या, महापौर झाल्यानंतर पहिलाच मोठा सत्कार जामखेड तालुक्याने केला आहे. त्यामुळे मी आजच महापौर झाले आहे, असे वाटते. यापुढील काळात महापालिकेच्या वतीने जामखेड तालुक्याला सर्वतोपरी मदत करू.
या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे व भाजपमधील काही कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला़ कोरगावकर यांनी त्यांचे स्वागत केले. जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, डॉ. विजय पाटील, प्रदीप भोरे यांचीही भाषणे झाली. सूत्रसंचालन गणेश हगवणे यांनी केले़ उपप्रमुख भारत चव्हाण यांनी आभार मानले.