खासदारांचा पत्ताच नाही

By Admin | Updated: June 9, 2014 00:02 IST2014-06-08T23:58:21+5:302014-06-09T00:02:33+5:30

शिर्डी : सदाशिव लोखंडे येथून प्रचंड मताधिक्याने संसदेत निवडून गेले असले तरी त्यांची खासदार सदाशिव लोखंडे, मु़ पो़- शिर्डी ही ओळख अद्याप तयार झालेली नाही़

There is no address of MPs | खासदारांचा पत्ताच नाही

खासदारांचा पत्ताच नाही

शिर्डी : सदाशिव लोखंडे येथून प्रचंड मताधिक्याने संसदेत निवडून गेले असले तरी त्यांची खासदार सदाशिव लोखंडे, मु़ पो़- शिर्डी ही ओळख अद्याप तयार झालेली नाही़ यामुळे मतदारच नव्हे, तर खुद्द पोस्टमनही शिर्डीत लोखंडे यांचा पत्ता शोधत असल्याने त्यांना येणाऱ्या पत्रांनाही घराच्या पत्त्याची प्रतीक्षा आहे़
शिर्डीसारख्या आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तीर्थक्षेत्र असलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाची देशात एक वेगळी ओळख आहे़ दिल्लीतही अनेक मंत्री, खासदार, उच्च पदस्थ अधिकारी शिर्डीच्या खासदारांची आवर्जून ओळख करुन घेतात़ नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपाचे सदाशिव लोखंडे काँग्रेसच्या भाऊसाहेब वाकचौरे यांना पराभूत करुन शिर्डीचे खासदार झाले़त्यामुळे लोखंडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला़ त्यांना प्रत्यक्ष भेटू न शकणाऱ्या अनेक नागरिकांनी शुभेच्छा पत्रे पाठवली. अनेकांनी कामासंदर्भात पत्रव्यवहार सुरू केला, यातील बहुतांश पत्रांवर खासदार सदाशिव लोखंडे, मु़ पो़ शिर्डी असा पत्ता असल्याने ही सर्व पत्रे शिर्डीत येऊन धडकली़ मात्र खासदार साहेबांचे घर अथवा कार्यालयाचा पत्ताच माहीत नसलेला पोस्टमन आता ही पत्रे कुठे द्यायची या चिंतेत आहे़
लोखंडे सलग तीन वेळा कर्जत-जामखेड मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले़ या काळात बऱ्याचदा त्यांचा मुक्काम त्यांनी सुरू केलेल्या शाळेत, मूळ गावी दिघोळ येथे किंवा विश्रामगृहावर असे़ या पंधरा वर्षाच्या काळातही त्यांचा कायम पत्ता निर्माण होऊ शकला नाही़ त्यांचा मूळ पत्ता मुंबईत होता़ आताही राजकीय घडामोडीत ते शिर्डीसारख्या देशपातळीवर ओळख असलेल्या मतदारसंघातून खासदार झाले़ शिर्डीत पूर्णवेळ कामाची आवश्यकता असल्याने त्यांनी येथेच वास्तव्य करावे व त्यांचा पत्ता खासदार सदाशिव लोखंडे, मु़ पो़शिर्डी व्हावा अशी मतदारांना अपेक्षा आहे़ निवडणुकीतही त्यांनी तसे आश्वासन दिले आहे़ आता या आश्वासनाच्या पूर्तीवर मतदारांचेच नाही तर पोस्टमनचेही लक्ष लागले आहे.
(वार्ताहर)

Web Title: There is no address of MPs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.