मठाचीवाडीत २६ दिवसांपासून कोरोना लसीकरण नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:26 IST2021-09-12T04:26:27+5:302021-09-12T04:26:27+5:30
शेवगाव : एकीकडे राज्यात विक्रमी संख्येने लसीकरण मोहीम राबवली जात असताना दुसरीकडे शेवगाव तालुक्यातील मठाचीवाडी या गावाला तब्बल २६ ...

मठाचीवाडीत २६ दिवसांपासून कोरोना लसीकरण नाही
शेवगाव : एकीकडे राज्यात विक्रमी संख्येने लसीकरण मोहीम राबवली जात असताना दुसरीकडे शेवगाव तालुक्यातील मठाचीवाडी या गावाला तब्बल २६ दिवसांपासून कोरोना प्रतिबंधक लस न मिळाल्याने ग्रामस्थांना निराश होऊन घरी परतावे लागले आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवली जात आहे. सर्वत्र मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होऊन विक्रमी लसीकरण केले जात आहे. एकीकडे लसीचा मुबलक पुरवठा होत असताना तालुक्यातील मठाचीवाडी गावात मागील महिन्यातील १७ ऑगस्टला लसीकरण राबविण्यात आले होते. त्यानंतर येथील नागरिकांना लस मिळाली नाही. शनिवारी (दि.११) लसीकरण होणार आहे. ग्रामस्थ लस घेण्यासाठी जिल्हा परिषद शाळेत मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते. मात्र लस न मिळाल्याने लसीकरणाविना नागरिकांना निराश होऊन घरी परतावे लागले आहे. ३ हजार लोकसंख्या असलेल्या गावातील ७५० नागरिकांना लस मिळाली आहे, असे सरपंच रूक्मिणी धोंडे, उपसरपंच विठ्ठल जगदाळे यांनी सांगितले.
याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संकल्प लोणकर म्हणाले, रोटेशन प्रमाणे लसीचे ढोस पुरविले जातात. मात्र मठाचीवाडीबाबत असे का झाले याची माहिती घेतो.