..तर स्वत:च्या घरासाठी ठोठावा लागेल न्यायालयाचा दरवाजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:27 IST2021-07-07T04:27:07+5:302021-07-07T04:27:07+5:30

अरुण वाघमोडे अहमदनगर : घर खाली करण्याच्या कारणातून बहुतांश वेळा घरमालक व भाडेकरूंमध्ये वाद उद्भवतात. काही वेळा हे वाद ...

..Then you have to knock on the door of the court for your own house | ..तर स्वत:च्या घरासाठी ठोठावा लागेल न्यायालयाचा दरवाजा

..तर स्वत:च्या घरासाठी ठोठावा लागेल न्यायालयाचा दरवाजा

अरुण वाघमोडे

अहमदनगर : घर खाली करण्याच्या कारणातून बहुतांश वेळा घरमालक व भाडेकरूंमध्ये वाद उद्भवतात. काही वेळा हे वाद इतके विकोपाला जातात की, यातून हाणामारीच्याही घटना घडतात. घर खाली करण्याचे पोलिसांना अधिकार नसल्याने मालकांना स्वत:च्या घरासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावा लागतो. घर भाडेतत्त्वावर देताना मालकाने कायदेशीर बाबींची काळजी घेतली तर पुढील प्रश्न उद्भवत नाहीत, असे मत अनुभवी वकिलांनी व्यक्त केले आहे.

घर बळकविल्याच्या प्रकरणी जिल्ह्यात ग्रामीणपेक्षा शहरी भागातील सर्वाधिक जास्त तक्रारी न्यायालयात दाखल आहेत. बहुतांश वेळा घरमालक भाडेकरूंची पार्श्वभूमी न पाहता ब्रोकरवर विश्वास ठेवून घर भाड्याने देतात. करारनामाही केला जात नाही. अशा प्रकरणांत मालकाने घर खाली करण्यास सांगितल्यानंतर भाडेकरू दाद देत नाहीत. त्यामुळे वाद उद्भवतात. नगर शहरात वेगवेगळ्या भागात घरांत भाडेतत्त्वांवर राहणाऱ्यांची मोठी संख्या आहे. बंगला अथवा मोठा फ्लॅट भाडेतत्त्वावर देणारे मालक करारनामा करतात. मात्र छोट्या वसाहतीतील वनरूम किचन भाड्याने देताना करारनाम्याकडे दुर्लक्ष केले जाते. याचा त्रास घरमालकांनाच सहन करावा लागतो.

-----------------------

घराचा गैरवापर करण्याचे प्रकार

घर भाड्याने घेतल्यानंतर त्याचा अवैध व्यवसायासाठी वापर केल्याच्या घटना नगर शहरात समोर आल्या आहेत. अशा प्रकरणांत पोलिसांकडून कारवाई झाल्यानंतर घरमालकही अडचणीत आले आहेत. त्यामुळे भाडेकरूंची पार्श्वभूमी तपासून घेणे गरजेचे आहे.

---------------------

पोलीस व्हेरिफिकेशनकडे दुर्लक्ष

घरमालकांसाठी स्थानिक पोलीस ठाण्यात भाडेकरूंचे व्हेरिफिकेशन बंधनकारक आहे. ते न केल्यास इंडियन पिनल कोडमधील कलम १८८ नुसार ‌हा शिक्षेस पात्र गुन्हा ठरू शकतो. नगर शहरात मात्र भाडेकरूंचे पोलीस व्हेरिफिकेशनचे प्रमाण अवघे तीन ते चार टक्के इतके आहे. व्हेरिफिकेशनमुळे भाडेकरू गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असेल तर त्याची माहिती मिळते.

-----------------------

घर भाड्याने देताना ही काळजी घ्या

भाडेकरूची पार्श्वभूमी तपासावी

करारनामा करावा

पोलीस व्हेरिफिकेशन करावे

भाडेकरूचे नाव, वय व कायमस्वरूपी पत्ता घ्यावा.

भाड्याची रक्कम, डिपॉझिटची रक्कम व कराराचा कालावधी

भाडेकरूमुळे घराचे नुकसान झाल्यास दंडाची तरतूद ठेवावी

भाडेकरूने वेळेत घर रिकामे न केल्यास नोटीसचा कालावधी व अतिरिक्त शुल्क

------------------------

घर भाडेतत्त्वावर देताना प्रथम करारनामा करून घ्यावा, यामध्ये सर्व अटी व शर्ती नमूद कराव्यात. भाडेकरूने नियमांचे उल्लंघन केले तर न्यायालयात जाता येते. मात्र करारनामा नसेल तर घरमालकांना अडचणींचा सामना करावा लागतो.

- ॲड. सुरेश लगड, ज्येष्ठ विधितज्ज्ञ

Web Title: ..Then you have to knock on the door of the court for your own house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.