...तर विखेंचा मनसुबा उधळून लावणार; तनपुरे यांनी दर्शविली दक्षिणेतून लोकसभेच्या आखाड्यात उतरण्याची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 19:39 IST2017-12-18T19:38:14+5:302017-12-18T19:39:04+5:30
अहमदनगर दक्षिण मतदार संघात जर राष्ट्रवादी काँग्रेसकडून संधी मिळाली तर खासदारकी लढविण्यास तयार असल्याचे सांगत प्रसाद शुगरचे अध्यक्ष तथा राहुरीचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी थेट विखेंचे मनसुबे उधळून लावण्याचेच सुतोवाच केले आहेत.

...तर विखेंचा मनसुबा उधळून लावणार; तनपुरे यांनी दर्शविली दक्षिणेतून लोकसभेच्या आखाड्यात उतरण्याची तयारी
राहुरी : अहमदनगर दक्षिण मतदार संघात जर राष्ट्रवादी काँग्रेसकडून संधी मिळाली तर खासदारकी लढविण्यास तयार असल्याचे सांगत प्रसाद शुगरचे अध्यक्ष तथा राहुरीचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी थेट विखेंचे मनसुबे उधळून लावण्याचेच सुतोवाच केले आहेत.
गुजरातमधील निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर प्राजक्त तनपुरे यांनी हे विधान केले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत डॉ़ उषाताई तनपुरे यांनी शिवसेनेकडून निवडणुक लढविली होती. निवडणुकीनंतर तनपुरे शिवसेनेत रमले नाहीत. त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत राष्ट्रवादी काँगे्रसशी सलगी वाढविली. नगराध्यक्षपदावर विराजमान झाल्यानंतर राहुरी मतदार संघात संपर्क वाढविला होता. त्यामुळे भावी आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहीले जात होते. मात्र सोमवारी सायंकाळी अचानक प्राजक्त तनपुरे यांनी लोकसभा निवडणुक लढविण्यास स्वारस्य दाखविले आहे.
प्राजक्त तनपुरे हे कोरी पाटी असून दक्षिणेत नातेवाईक व मित्रमंडळ आहे़ माजी खासदार प्रसाद तनपुरे यांना दक्षिणेत मतदारांनी साथ दिली होती. या पार्श्वभूमीवर प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी मिळाल्यास यशस्वी होऊ शकतात, असे कार्यकर्त्यांना वाटत आहे. माजी अर्थमंत्री जयंत पाटील हे तनपुरे यांचे मामा असून दक्षिणेत तरूण उमेदवार म्हणून संधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
डॉ. सुजय विखे हे भाजपमध्ये जातात की नाही हे अद्याप गुलदस्त्यात आहे. भाजपमध्ये विखे गेल्यास तनपुरे-विखे या दोन तरूण दादामध्ये लढत होऊ शकते. नगर दक्षिणेची जागा राष्ट्रवादीकडे आहे़ राष्ट्रवादीने प्राजक्त तनपुरे यांना खासदारकीची उमेदवारी दिल्यास विखे यांच्या मनसुब्यांना सुरुंग लागणार आहे, असे राजकीय वर्तुळातून सांगण्यात येते.