...तर ‘स्वाभिमानी’ची नेवाशात बंडखोरी
By Admin | Updated: July 30, 2014 00:45 IST2014-07-29T23:29:19+5:302014-07-30T00:45:35+5:30
कुकाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी नेवासा विधानसभेची जागा सोडावी, अशी मागणी महायुतीकडे केली आहे.

...तर ‘स्वाभिमानी’ची नेवाशात बंडखोरी
कुकाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी नेवासा विधानसभेची जागा सोडावी, अशी मागणी महायुतीकडे केली आहे. परंतु तसे न झाल्यास येथे बंडखोरी केली जाईल, असा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अंबादास कोरडे यांनी दिला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र भंडारी यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत कोरडे यांनी ही भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, नेवासा मतदारसंघाची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडावी अशी मागणी खासदार राजू शेट्टी व महायुतीच्या नेत्यांकडे केली आहे. महायुतीचा आमदार नसलेला मतदार संघ शेतकरी संघटनेस सोडण्यात महायुती तयार आहे. नेवासा तालुका हा क्रांतीकारी मतदारसंघ आहे.
परंतु ही जागा न मिळाल्यास बंडखोरी करुन राजेंद्र भंडारी यांना येथून उभे करुन जिल्ह्यातील स्वाभिमानी कार्यकर्त्यांची ताकद त्यांच्या मागे उभी करु. लवकरच कुकाणा येथे खा. राजू शेट्टींच्या उपस्थितीत मेळावा घेऊन भूमिका जाहीर करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.
माजी खासदार तुकाराम गडाख, विठ्ठलराव लंघे यांनी सत्ताधाऱ्यांशी हात मिळवून शेतकऱ्यांना विश्वासघात केला. परंतू आपण आयुष्यात कधीच सत्ताधाऱ्यांशी तडजोड केली नाही व आणि करणारही नाही, असे भंडारी यांनी सांगितले. यावेळी जिल्हा प्रचारप्रमुख प्रताप पटारे यांचे भाषण झाले.
याप्रसंगी स्वाभिमान शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मोहन गायकवाड, युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधाकर होंडे, माजी उपसरपंच राजेंद्र चाबुकस्वार, शिवसेनेचे रावसाहेब कावरे, सेवा संस्थेचे अध्यक्ष शेषराव साबळे, मुसाभाई इनामदार आदी उपस्थित होते. प्रा. रज्जक इनामदार यांनी आभार मानले. (वार्ताहर)