कोरडगावात हॉस्पिटलची तोडफोड करून चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:21 IST2021-05-07T04:21:43+5:302021-05-07T04:21:43+5:30
कोरडगाव : पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव येथे हॉस्पिटलची तोडफोड करत राहत्या घरी डॉक्टर व त्यांच्या मुलींना दमदाटी करत रोकडसह अडीच ...

कोरडगावात हॉस्पिटलची तोडफोड करून चोरी
कोरडगाव : पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव येथे हॉस्पिटलची तोडफोड करत राहत्या घरी डॉक्टर व त्यांच्या मुलींना दमदाटी करत रोकडसह अडीच लाखांचा ऐवज चोरांनी लंपास केला. ही घटना गुरुवारी रात्री दोनच्या सुमारास घडली.
कोरडगाव येथे डॉ. अजय औटी यांनी याबाबत पाथर्डी पाेलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. औटी यांचे कोरडगाव येथील पाथर्डी-बोधेगाव रस्त्याच्या लगत राहत्या घरीच खालच्या खोलीमध्ये हॉस्पिटल आहे. बुधवारी रात्री डॉ. औटी हे घराच्या छतावर झोपले होते. तर त्यांची पत्नी व दोन मुली घरात झोपल्या होत्या. गुरुवारी रात्री दोनच्या सुमारास चोरांनी लोखंडी गेट, दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. घरात झोपलेल्या डॉक्टरांच्या पत्नी व मुलींना
घरामधील पत्नी तसेच दोन मुलींना धारधार शस्त्राचा धाक दाखवून कपाटाच्या चाव्यांची मागणी केली. त्यामधील दीड लाखाची रक्कम, पत्नीच्या गळ्यातील व मुलींच्या कानातील सोन्याचे दागिने काढून घेतली व घरातून चोरांनी पोबारा केला. चोरटे निघून गेल्यानंतर डॉ. औटी यांना कुटुंबीयांनी हा प्रकार सांगितला. औटी यांनी तात्काळ गावातील ग्रामस्थांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी व गावकऱ्यांनी पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु तेथील दूरध्वनी क्रमांक बंद असल्याने संपर्क होण्यास उशीर झाला. चोरांनी घरातीलच असलेल्या हॉस्पिटलच्या साहित्याचीही तोडफोड केली.
घटनेची माहिती मिळतास पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांनी चोरीच्या ठिकाणी भेट दिली. ठसेतज्ज्ञ, श्वान पथकास पाचारण करण्यात आले. ठसेतज्ज्ञ माधुरी लेंगटे यांनी ठसे मिळाल्याची माहिती दिली. श्वान पथक मात्र चोरांचा माग काढू शकले नाही.
कोरडगाव बाजारपेठेमध्ये सतत होणाऱ्या चोऱ्यांमुळे व्यापारी, ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीची वातावरण आहे. पोलीस प्रशासनाकडून या मागे झालेल्या चोऱ्यांचा तपास लागलेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. अरविंद जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुहास बटुळे, समीर शेख यांनी पंचनामा केला. पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांच्याकडे पुढील तपास आहे.
--
पोलीस ठाण्याचा अधिकृत फोन बंद आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी घटना घडल्यानंतर पोलीस ठाण्याला संपर्क करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. हा दूरध्वनी पोलीस प्रशासनाला तात्काळ सुरू करावा.
-स्वनील देशमुख,
अध्यक्ष, मेडिकल असो. कोरडगाव,
---
०६ कोरडगाव चोरी
काेरडगाव येथे डॉ. अजय औटी यांच्या घरात चोरांनी केलेली उचकापाचक.